कोनवडे येथील जॅकवेल कोसळली : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर: लाखोंचे नुकसान : जलजीवनचे काम कधी होणार?

कोनवडे येथील जॅकवेल कोसळली : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
लाखोंचे नुकसान : जलजीवनचे काम कधी होणार?
सिंहवाणी ब्युरो गारगोटी :
कोनवडे (ता.भुदरगड) येथील पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल जमिनदोस्त झाले असुन पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे . सध्या पावसाळा सुरु असल्याने साथीच्या आजाराने नागरीक बेजार झाले असुन त्यातच जॅकवेल जमीनदोस्त झाल्याने आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे .
सन १९८२-८४ या काळात या जॅकवेलचे काम करण्यात आले होते. त्यानंतर सन २००९ च्या दरम्यान राज्य सरकारच्या भारत निर्माण योजनेमधुन डागडुजी आणि जॅकवेलचा गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते. परंतु जॅकवेलचा मुळ ढाचा आहे तसा होता. त्यामुळे गेली ४२ वर्षांमध्ये झालेले बांधकाम अखेरची घटका मोजत होते. जॅकवेलचे बांधकाम कमकुवत झाल्याने सन २०२१ साली ग्रामपंचायतीने जलजीवन मिशनमधुन जॅकवेल, इंटक, फिल्टर हाऊस यासाठी सरकारकडून ८१ लाखाचा निधी मिळाला. पण ग्रामपंचायतीच्या त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांच्या राजकीय हेवेदाव्यातून, दुहीमुळे या योजनेचे काम रखडले. ते आजतागायत जैसे थे आहे. परिणामी जॅकवेल बांधकाम कमकुवत झाल्याने अखेर जॅकवेल जमिनदोस्त झाले.
जलजीवनचे काम कधी होणार?
ग्रामपंचायत कडून २०२१ साली पदाधिकाऱ्यांच्या राजकीय हेवेदाव्यातून, दूहीमुळे ८१ लाखाची जलजीवनची योजना रखडली. आता पुन्हा नविन कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे देण्यात आला आहे. सध्या निधीचा तुटवटा, त्यातच झालेल्या जलजीवनची प्रलंबित बिले आहेत. त्यामुळे नवीन देण्यात आलेल्या कामांना मंजूरी कधी मिळणार? याबाबत सध्या सरकारच अनभिज्ञ आहे