महिलांनी उद्योग, व्यवसायाकडे वळून स्वतःच्या पायावर उभा राहण्याची गरज : सौ.रोहिणी अर्जुन आबिटकर उमेद महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा व स्नेहमेळावा संपन्न

महिलांनी उद्योग, व्यवसायाकडे वळून स्वतःच्या पायावर उभा राहण्याची गरज : सौ.रोहिणी अर्जुन आबिटकर
उमेद महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा व स्नेहमेळावा संपन्न
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
महिलांनी उद्योग, व्यवसायाकडे वळून स्वतःच्या पायावर उभा राहण्याची गरज असून यासाठी शासनाच्या विविध योजनांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणी अर्जुन आबिटकर यांनी केले.
श्री.इंजूबाई सांस्कृतिक हॉल, गारगोटी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला स्नेहमेळाव्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन सौ.रोहिणी आबिटकर बोलत होत्या. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रारंभी प्रतिमापुजन गारगोटी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश वास्कर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सखी सह्याद्री प्रोड्युसर कंपनीचे राज्य समन्वयक श्री.संतोष मधाळे, पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक निलेश डवरी यांनी मार्गदर्शन केले. उमेद प्रभाग संघांतर्गत यशस्वी उद्योजिकांचा सत्कार सौ.रोहिणी आबिटकर व सरपंच प्रकाश वास्कर यांच्या हस्ते करण्यात आला. उद्योजिकांच्या वतीने सुगरण महिला गृह उद्योगाच्या सौ.विद्या माणगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभाग संघाचे अहवाल वाचन लिपिका अनुराधा बोटे यांनी केले. सखी सह्याद्री कंपनी कंपनीच्या कार्याचा आढावा श्री.रणजीत कांबळे यांनी घेतला.
यावेळी सखी सह्याद्री प्रोड्युसर कंपनीचे राज्य समन्वयक श्री.संतोष मधाळे, उमेद महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ.अर्चना पांगिरेकर, सचिव सौ.प्रणिता नाईक,कोषाध्यक्ष सौ.सरिता भोसले, सखी सह्याद्री प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणजित कांबळे, शारदा पोवार, सौ.अस्मिता पाटील, सौ.सोनार, प्रभाग समन्वयक पशुव्यवस्थापक श्री.गुरव सर्व सीआरपी, बँक सखी, कृषी सखी, पशु सखी, कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, तालुका अभियान कक्षाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यासह सर्व ग्राम संघाचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक उमेद महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ.अर्चना पांगिरेकर यांनी तर सूत्रसंचालन मीनाक्षी पावले व सौ. मनीषा हेमंत मोरस्कर यांनी केले.
फोटो : उमेद महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सभा व स्नेहमेळाव्याप्रसंगी सौ.रोहिणी आबिटकर, सौ.अर्चना पांगिरेकर, श्री.संतोष मधाळे, निलेश डवरी आदी