गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचाची बार्शी येथे प्रेयसी नर्तिकेच्या घरासमोर आत्महत्या! : कारमध्येच स्वत:वर झाडली गोळी : आत्महत्या की खून ❓

गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचाची बार्शी येथे प्रेयसी नर्तिकेच्या घरासमोर आत्महत्या!
कारमध्येच स्वत:वर झाडली गोळी;
आत्महत्या की खून ❓
सिंहवाणी ब्युरो l महेश गायकवाड, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे या गावातील प्रेयसी नर्तिकेला भेटायला आलेल्या गेवराई जिल्हा बीड येथील एका उद्योजकाचा प्रेयसी च्या घरासमोर मृतदेह आढळून आला आहे यामुळे हा खून की आत्महत्या असा पेच बार्शी पोलिसांसमोर उभा टाकला आहे.
बार्शी तालुक्यातील सासुरे येथे असलेल्या प्रेयसी नर्तकीला भेटायला आलेल्या लुखामसला (ता. गेवराई) गावच्या माजी उपसरपंचाने येथील तिच्याच घरासमोर कारमध्ये बसून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे: या आत्महत्येमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली असली तरी हा खून आहे की उद्योजकाने आत्महत्या केली आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रेयसी नर्तिकेला भेटण्यासाठी तिच्या सासुरे या गावी भेटायला येऊनही तिने कॉल न उचलल्याने त्याने जीवन संपविले. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) असे मृताचे नाव आहे. मृत गोविंद यांच्या मेहुण्याच्या फिर्यादीवरून संशयित नर्तकीविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
घटनेची माहिती मिळताच मंगळवारी (ता. ९) बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, वैराग पोलिसही घटनास्थळी आले होते. सायंकाळच्या सुमारास गोविंद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, लुखामसला गावचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे हा कला केंद्रात नेहमी येत होता. सुमारे एक- दीड वर्षापूर्वी कला केंद्रामध्ये सासुरे (ता. बार्शी) परिसरातील एका नर्तिकेसोबत गोविंदची ओळख झाली. तेथून ती पारगाव कला केंद्राकडे जाऊ लागली आणि गोविंदची मैत्री वाढली व त्यांच्यात प्रेम झाले. यातून अनेकदा त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे बर्गे यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्या तरुणीने गोविंद याच्यासोबतचा संपर्क तोडला होता, त्यामुळे तो नैराश्यात होता. त्या नैराश्यातूनच गोविंद सोमवारी (ता. ८) मध्यरात्री गेवराईवरून सासुरे गावी आला होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडल्याचेही त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, बार्शी विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर, वैराग ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित जगदाळे यांनी भेट दिली.
पोलिस पाटलांकडून खबर अन्…
सासुरे येथील पोलिस पाटील शीतल करंडे यांनी गावातील एका व्यक्तीच्या घरासमोर थांबलेल्या चारचाकी कारमध्ये (एमएच २३, बीएस ५०२३) एकजण मृतावस्थेत असल्याची खबर वैराग पोलिसांना दिली. त्याच्याकडे एक पिस्टल दिसत होते. वैराग पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. ज्याच्या घरासमोर गाडी होती, त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी गोविंद बर्गे हा माझ्या बहिणीस भेटण्यास आला होता असे पोलिसांना सांगितले. मात्र, तो कधी आला याची माहिती नसून मी सकाळीच त्याला पाहिले, असेही त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले.
घटनास्थळी काय आढळले…
पोलिसांनी गाडी जवळ जाऊन पाहिले, गाडी आतून लॉक होती
पोलिसांनी गोविंदच्या नातेवाईकांशी संपर्क साधून दुसरी चावी मागवून गाडीचे लॉक काढले
गाडीत परदेशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक पुंगळी आढळली, त्याच बंदुकीतून गोळी सुटल्याचे स्पष्ट
पोलिसांनी नातेवाइकांच्या उपस्थितीत मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविला
बंदूक विनापरवाना, त्यात होती एकच गोळी
गोविंद बर्गे याने ज्या बंदुकीतून गोळी झाडून घेतली, त्यात एकच गोळी होती. त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. त्याच्याकडे परवान्याची कोणतीही बंदूक नव्हती, असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. त्याच्याकडे असलेली विनापरवाना बंदूक कोणाची व ती कोठून घेतली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
गुन्ह्याचे नेमके कारण काय?
संशयित नर्तकी (वय २१) हिने गोविंदसोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध जुळवले. त्यातून वेळोवेळी पैसे, सोने व तिच्या मावशी व नातेवाइकांच्या नावावर प्लॉट, जमीन घेतली. पुन्हा भावाच्या नावावर पाच एकर शेती कर आणि गेवराईतील नवीन घर नावावर कर; नाहीतर तुला बोलणार नाही, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी तिने दिली होती. तिने पैशासाठी तगादा लावल्याने भावजी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण (रा. नंदापूर, जि. जालना) यांनी वैराग पोलिसांत रात्री उशिरा दिली. त्यावरून नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजित जगदाळे हे करीत आहेत
ठळक
▪️बार्शी तालुक्यात युवकाचा गाडीत मृतदेह आढळला
▪️गोळीबारातून मृत्यू, आत्महत्या की खून याबाबत संभ्रम
▪️मृत युवकाची ओळख गोविंद जगन्नाथ बर्गे (३८, बीड) अशी झाली
▪️गाडीत पिस्तूल आढळल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू