जिल्हाताज्या घडामोडी

स्वप्नाला सत्याकडे नेण्यासाठी काळजात स्वप्न, मनगटात धमक आवश्यक : प्राचार्य मिलिंद पांगिरेकर

स्वप्नाला सत्याकडे नेण्यासाठी काळजात स्वप्न, मनगटात धमक आवश्यक : प्राचार्य मिलिंद पांगिरेकर

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
मेहनत, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा हाच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा मार्ग असून काळजात स्वप्न आणि मनगटात धमक असेल तर आपण कोणत्याही स्वप्नाला सत्याकडे घेऊन जाऊ शकतो, असे उदगार कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे व्हा.चेअरमन प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी काढले.
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित श्री.आनंदराव आबिटकर इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, गारगोटी येथील इ.११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य पांगिरेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था प्रतिनिधी श्री.अवधूत परुळेकर होते.
यावेळी बोलताना प्राचार्य पांगिरेकर म्हणाले, अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायला हवेत. अपयशातच अनुभव आणि यशाचा पाया दडलेला असतो. यश मिळवण्यासाठी चिकाटी, परिश्रम आणि शिस्त या गोष्टींची गरज असते. सकारात्मक विचारच माणसाला कठीण प्रसंगातही धैर्य देतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शिस्त, वेळेच्या नियोजनास प्राधान्य देणे आवश्यक आहे. मैत्री आणि मेहनत या दोन गोष्टींनी शिक्षण अधिक समृद्ध होते.
यावेळी प्राचार्य तुकाराम माने यांनी कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच श्रीधर नारेंकर, सिद्धी जाधव, आदित्य आठले आदी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. सेट परीक्षेत यश मिळविल्याबद्दल कडगाव कॉलेजचे प्रा.रोहित गुरव यांचा श्री.अवधूत परुळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी, प्रा.रोहित गुरव, प्रा.निलेश कासार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक तुकाराम माने यांनी आभार एंजल रॉड्रिक्स यांनी तर सुत्रसंचालन कु.आदिती शिंदे व भूमिका इंगवले हिने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button