पुष्पनगर दरोडेखोरांच्या टोळीला भुदरगड पोलिसांनी केले जेरबंद: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बारा दरोडेखोरांना अटक

पुष्पनगर दरोडेखोरांच्या टोळीला भुदरगड पोलिसांनी केले जेरबंद:
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बारा दरोडेखोरांना अटक
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
भुदरगड – पुष्पनगर येथे सराफी दुकान व घरफोडी करून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत टोळीचा भुदरगड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश केला आहे. त्यांच्या लाखांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. पोलीस निरीक्षक किरण लोंढे व पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली आहे.
सोमवारी पहाटेच्या सुमारास पुष्पनगर येथील आशिष अरविंद होगाडे यांच्या सराफी दुकानात, शेजारील बांगड्याच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र चाहुल लागल्याने तो फसला होता यावेळी चोरट्यांनी शामराव रावजी बाबर यांच्या घरातून सुमारे एक लाख रूपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास झाले होते. या प्रकरणी भुदरगड पोलिसात आज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनास्थळी मिळालेल्या माहितीचा अभ्यास करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दोन तपास पथके तयार केली. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे आदमापूर येथे छापा टाकून मंगळवारी नऊ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसुन चौकशी केली असता आणखी तीन साथीदारांची नावे पुढे आली. बुधवारी या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या घटनेतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, शाहबाज शेख, योगेश गोरे, सहायक फौजदार महादेव मगदुम, पोहेकॉ विनोद दबडे, सुभाष चौगले, रुपाली रानगे, राजु गाडीवड्ड, रोहित टिपुगडे, विक्रम चौत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
याप्रकरणी सिकंदर गोविंद काळे, (वय -३७), प्रकाश बन्सी काळे, (वय- २६), रमेश विलास शिंदे (वय- ३५), आक्काबाई सिकंदर काळे (वय- ३०), विलास छन्नु शिंदे वय- ५२), चंदाबाई विलास शिंदे, (वय- ५०, सर्व रा. इटकोर, ता. कळंब, जि. धाराशिव), शंकर पोपट शिंदे (वय- २०), राजन दत्ता शिंदे (वय- २०, रा. कोठाळवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) सोमनाथ उर्फ सोम्या सुंदर पवार (वय-२५, रा. वरपगाव, ता. केज, जि. बीड, मंगल रमेश शिंदे (वय-३६), राजेंद्र बप्पा पवार, (वय -६५), ललीता राजेंद्र पवार (वय- ४२, रा. वाकडी) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भुदरगड पोलिसांनी वेगवान तपास करून सराईत दरोडेखोर टोळीला जेरबंद करत गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरोडयाचे गंभीर गुन्हे……
अटक करण्यात आलेले सराईत आरोपी सिकंदर गोविंद काळेवर ३१, रमेश विलास शिंदेवरवर ११, विलास छन्नू शिंदे वर २४, राजेंद्र बप्पा पवार वर ५ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. दरोडा, घरफोडी व चोरी हे त्यांचे प्रमुख गुन्हे आहेत.