ताज्या घडामोडी

श्री शाहू वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करणार – माजी आमदार बजरंग देसाई : भुदरगडमधील मान्यवरांची ५ ऑक्टोबरला व्यापक बैठक

श्री शाहू वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करणार
माजी आमदार बजरंग देसाई :

भुदरगडमधील मान्यवरांची ५ ऑक्टोबरला व्यापक बैठक

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :-
येथील श्री शाहू वाचनालयास दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त वाचनालयाचा
शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या अंतर्गत चार-पाच महिने भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी भुदरगड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची ५ ऑक्टोबरला व्यापक बैठक होणार आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष माजी आमदार बजरंग देसाई व संचालक शामराव देसाई यांनी पत्रकार बैठकीत दिली


भुदरगड तालुक्यातील वाचन चळवळीला दिशा देणाऱ्या आणि वैचारिक प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या, अनेक प्रसिद्ध लेखक, सूज्ञ वाचक घडविणाऱ्या येथील श्री शाहू वाचनालयाची स्थापना ७ फेब्रुवारी १८७६ साली झाली. आजतागायतच्या प्रवासात हे वाचनालय अधिकाधिक समृद्ध होत आहे. या वाचनालयास यावर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. वाचनालयात ८३ दुर्मिळ ग्रंथ व
३५ हजार ८६० इतकी ग्रंथ संपदा आहे. हे वाचनालय गारगोटीच्या वैभवात भर टाकत आलेले आहे.


या वाचनालयास माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब देसाई, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, व. पू. काळे यांच्यासह विविध मान्यवरांनी स्थापनेपासून भेटी दिल्याच्या नोदी वाचनालयात उपलब्ध आहेत. गारगोटीसह भुदरगड तालुक्याच्या इतिहासाचे हे वाचनालय साक्षीदार आहे. तालुक्यात वाचन चळवळ रुजविण्यासाठी आणि ग्रंथालय स्थापनेसाठी या वाचनालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या वाचनालयाचा १५० वा वर्धापनदिन वर्षभर साजरा करावयाचा आहे. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे नियोजन करायचे आहे. यासाठी तालुक्यातील सर्व सभासद, वाचक, नागरिक यांना विविध उपक्रमात
सहभागी करून घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button