ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविशेष

कळंब येथील काळे कुटुंबीयांच्या प्रयत्नांने अपघातातील चौघा अनोळखी जखमींना तातडीची मदत : गंभीर जखमीचा जीवही वाचला

कळंब येथील काळे कुटुंबीयांच्या प्रयत्नांने अपघातातील चौघा अनोळखी जखमींना तातडीची मदत 

गंभीर जखमीचा जीवही वाचला

सिंहवाणी ब्युरो / कळंब
आज काल रस्त्यावर अपघात झाला तर त्याकडे लक्ष न देता निघून जाणे आणि जर थांबलेच तर फोटो, व्हिडिओ काढणे ही प्रवृत्ती सर्वत्र वाढत आहे. मात्र कळंब येथील काळे कुटुंबीयांच्या प्रयत्नांनी एका अपघातातील चौघा जखमींना तातडीची मदत तर मिळालीच, पण एका गंभीर जखमीचा जीवही वाचला. विशेषता हे सर्वजण दवाखान्यात उपचार सुरू होईपर्यंत अनोळखीच होते. ही घटना घडली आहे, धाराशिव जिल्ह्यातील मांजरा नदीच्या पुलाजवळ.
या घटनेविषयी सिंहवाणीशी बोलताना ईश्वर मनोहर काळे यांनी सांगितले की आपण स्वतः व पुतण्या समर्थ जीवन काळे दोघेजण जरांगे पाटील यांच्या मीटिंगसाठी अंतरवाली सराटी येथे गेलो होतो. मीटिंग आटोपून घरी परतत असताना रात्रीचे साडेसातच्या सुमारास मांजरा नदीच्या पुलाजवळ आलो असता अपघात झाल्याचे दिसले. गाडी थांबून चौकशी केली. तेथे मोटर सायकल आणि अज्ञात वाहनाचा अपघात झाला होता. तिघे चौघे जखमी झाले होते. अशा अवस्थेत आम्ही पुढे होऊन जखमीना दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळीच आमचे चुलते मोहन प्रल्हादराव काळे हे आपल्या कार ने आंबेजोगाई हून येत होते. त्यांच्या गाडीत तिघा जखमींना घालून कळंब येथील सरकारी इस्पितळात घेऊन आलो.
यानंतर जखमीवर कळंब येथे प्राथमिक उपचार सुरू झाले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, या जखमी पैकी एकजण गंभीर आहे. त्यास तातडीने आंबेजोगाई येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलवले पाहिजे. आतापर्यंत यापैकी कोणाचीही ओळख पटली नव्हती. कोणाचेही नाव, गाव, पत्ता माहीत नव्हता. तरीही आम्ही त्यास ॲम्बुलन्स मधून आंबेजोगाईला हलवण्याचा निर्णय घेतला. माझे भाऊ गणेश काळे यांना फोन करून मोटर सायकलचे गॅरेज बंद करून तात्काळ येण्यास सांगितले.
अपघात स्थळावर मोटार सायकलचा काढलेला फोटो व त्यावरील नंबर प्लेट यावरून काही माग निघतो का हे पाहण्यासाठी मोहन काळे यांच्या सुनबाई सौ. कोमल मोरे (काळे ) यांच्याकडे तो फोटो पाठवला. काळे मॅडम आंबेजोगाई येथे आरटीओ कार्यालयात असतात त्यांनी शोध घेऊन जखमींच्या नातेवाईकांचा फोन नंबर व माहिती मिळवून दिली. त्यानंतर या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली.
लगेचच आम्ही तुळजापुरला ज्योत आणण्यासाठी जाण्याचा कार्यक्रम रद्द करून ॲम्बुलन्स मधून जखमीला घेऊन आंबेजोगाई हॉस्पिटल गाठले जखमीस ऍडमिट केले. त्यावर उपचार सुरू झाले. जखमीचा धोका टळला…
आई जगदंबेच्या कृपेने एक बेवारस पडलेल्या जखमीचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे आम्हास समाधान वाटते.. असे शेवटीईश्वर मनोहर काळे यानी सांगितले. सदर पेशंटची तब्येत सध्या व्यवस्थित असून लातूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये अंतररुग्ण म्हणून उपचार सुरू आहेत.



काळे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक
याप्रसंगी कळंब येथील ईश्वर मनोहर काळे, गणेश पप्पु काळे, मोहन दादा काळे, समर्थ जीवन काळे, सौ. कोमल मोरे (काळे) मॅडम RTO, अंबाजोगाई.
या चौघांनी केलेल्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button