भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली ; परिसरातील हजारो नागरिकांचा संपर्क तुटला : भात शेतीचे मोठे नुकसान; जनजीवन विस्कळीत

भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली ; परिसरातील हजारो नागरिकांचा संपर्क तुटला
भात शेतीचे मोठे नुकसान; जनजीवन विस्कळीत
सिंहवाणी ब्युरो / मिलिंद जाधव, भिवंडी :
आधीच पुरामुळे त्रस्त असलेल्या मराठवाड्यासाठी हा इशारा चिंतेचा विषय ठरत असताना ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने २४ तासांपासून धुमाकूळ घातलं असून ठाणे जिल्ह्यातील अनेक नद्या ओढ्याना पूर आला आहे. तर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांना जोडणारे पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर हवामान विभागाने ठाणे जिल्हात ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. 
भिवंडी तालुक्यास जोडणारा भातसा नदीवरील तर कल्याण तालुक्यातील वालकस पूल पाण्याखाली गेल्याने वालकस,बेहरे या गावातील हजारो नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. भातसा धरण विसर्ग सूचना पत्राचे अनुषंगाने, भातसा धरणांमधून भातसा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून ,भातसा नदीकाठावरील इतर गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना व गावातील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होण्या बाबतच्या सुचना आपले स्तरावर देण्यात आल्या आहेत, तसेच पुढील काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे भातसा नदीपात्राच्या पूर प्रवण क्षेत्रातील वांद्रे, सौर,कळंबोली, कोशिंबी, आतकोळी( मुरबी पाडा) भादाणे (जुपाडा, बाटलीपाडा), चिराडपाडा (आदिवासी वाडी) वांद्रे (आदिवासी वाडी), कांदळी, खडवली नदी जवळील परिसरातील मातोश्री वृद्धाश्रम परिसरात पाणी शिरले आहे. शेतघर असलेल्या ठिकाणी तसेच नदी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले असून, तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, पोलिस, सरपंच ,पोलिस पाटील, आशा सेविका,आरोग्य विभागाची टीम, युवक मंडळ यांनी बचाव कार्यास सहकार्य केले. तर खडवली पूल पाण्याखाली गेल्याने व रेल्वे सेवा ठप्प झाल्याने पावसाच्या काळात नागरीकांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचे कसे? हा मोठा संकट परिसरातील नागरिकांच्या समोर उभा राहीला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतकरी अडचणीत आले आहेत. तर पडघा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून खडवली, वालकस , कुंभेरी नदी,गांधारी ब्रिज, येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुसळधार पावसामूळे जिल्ह्यातील सर्वच शहरातील सखल भागात पाणी साचल्याने शेकडो नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहे. मुसलधार पावसामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील बहुतांश सखल भाग जलमय झाल्याने हजारो नागरिकांच्या दुकानासह घरातील संसरा उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. भिवंडी शहर, ग्रामीण भागातही पावसामुळे हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यात सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी खाडी, ओढे या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे इशारा जिल्हा प्रशासनकडून देण्यात आला आहे.तरी या कालावधीत सर्व विभागांनी दक्ष राहून तसेच एकमेकांशी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांनी केले आहे.