अभियंता पतीचं आमदार पत्नीला ‘ऑफिशियल’ पत्र: पत्नीला लिहिलेल्या पत्राची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा

अभियंता पतीचं आमदार पत्नीला ‘ऑफिशियल’ पत्र:
पत्नीला लिहिलेल्या पत्राची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा
सिंहवाणी ब्युरो / छत्रपती संभाजीनगर
खाजगी आयुष्यात पत्नी पतीला किंवा पती पत्नीला कुठलंही गोष्ट हक्कानं सांगू शकतो.. पण माझा फोटो वापरू नये, ही गोष्ट सांगायला एका पतीला आपल्याच पत्नीला ‘ऑफिशियल’ पत्र लिहावं लागल आहे. त्या मागचं कारणही तसंच रंजक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांना त्यांच्या पतीनं एक पत्र पाठवल असून त्यांचे पती अतुल चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत.. पण आपल्याच आमदार पत्नीला पत्र लिहायची वेळ त्यांच्यावर का आली? आमदार अनुराधा चव्हाण यांचे कार्यकर्ते प्रचार असो, वाढदिवस असो किंवा विविध योजनांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम सर्वत्र मोठमोठाले अभिनंदनाचे फलक लावतात. मात्र हीच बाब अतुल यांच्यासाठी डोकेदुखी ठरलीय. कारण आमदार अनुराधा चव्हाण यांच्या फलकावर त्यांचे हौशी कार्यकर्ते त्यांचे पती अतुल चव्हाण यांचाही फोटो छापतात.. याचा फायदा सोडा पण अतुल यांना मनस्ताप होतोय. त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि शासकीय पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. इतकंच नाही तर अतुल यांच्याविरोधात तक्रारी आणि माहिती अधिकारातले अर्ज केले जात आहेत. त्यामुळे विनाकारण आपल्याला त्रास होतोय असं म्हणत मतदारसंघातल्या आपल्या कार्यकर्त्यांना आवरा, अशी विनंती करणारं पत्रच त्यांना आपल्या आमदार पत्नीला धाडलं.. सध्या या पत्राचीच चर्चा फुलंब्री मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात होत ahe.