*आ. जयंत आसगावकर यांच्या फंडातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही वाटप*: *खा छत्रपती शाहू महाराज, आ. सतेज पाटील यांची उपस्थिती*

*आ. जयंत आसगावकर यांच्या फंडातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही वाटप*
*खा छत्रपती शाहू महाराज, आ. सतेज पाटील यांची उपस्थिती*
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील 150 हून अधिक माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही देण्यात आला. खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्यात आले. अनिकेत मंगल कार्यालय, महागाव, गडहिंग्लज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना, खासदार शाहू महाराज म्हणाले, आज काळ झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या काळात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. शिक्षकांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्याचा वापर शिक्षणात करून आपल्या विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवावे. आमदार जयंत आसगावकर यांच्या माध्यमातून शाळांसाठी साहित्य देण्याचा जो उपक्रम राबविला जातो, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या अनेक कार्यक्रमात मी स्वतः सहभागी झालो आहे. शिक्षकांप्रती त्यांची असणारी तळमळ वाखण्याजोगे आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून ते जागेवर सोडवणे, यात आसगावकर सरांचा हातखंडा आहे. ही आसगावकर सरांची वृत्ती मला आवडली. गेल्या पाच वर्षात आसगावकर सरांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावून शिक्षक आमदार कसा असावा, हे दाखवून दिले आहे. आसगावकर सरांच्या माध्यमातून शिक्षकांना एक चांगले नेतृत्व मिळणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. अशा माणसाचे कौतुक होणे हे स्वाभाविकच आहे. माझ्या सूचनेनुसारच त्यांनी आपला फंड रस्ते, गटारी यासाठी न वापरता तो केवळ शाळांसाठीच वापरला. शाळांना दिला जाणारा स्मार्ट टीव्ही हा फक्त शिक्षकांनाच नाही तर विद्यार्थ्यांनाही स्मार्ट बनवणार आहे.
प्रास्ताविकात आमदार जयंत आसगावकर म्हणाले, माझ्या फंडातून दिले जाणारे प्रत्येक साहित्य हा ब्रॅण्डेड असतो. हे साहित्य वाटप करताना अगदी पारदर्शकपणे तोही कार्यक्रम घेऊनच केला जातो. माझ्या कारकिर्दीत तीन वेळा टप्पावाढ झाली, जुन्या पेन्शनसाठी राज्यात पहिला मोर्चा कोल्हापुरातून निघाला. त्यानंतर राज्यभर असे मोर्चे निघाले. याचा परिणाम म्हणजे त्यासाठी शासनाला समिती नेमली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असून लवकरच आपल्या बाजूने निकाल लागेल. गेल्या पाच वर्षात आमचे नेते, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम सुरू आहे. शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेणे ते सोडवणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. त्यात मी कोठेही कमी पडणार नाही. माझे आयुष्य मी शिक्षकांसाठी समर्पित केले आहे, तुमची साथ सदैव माझ्या पाठीशी राहू दे, अशी अपेक्षा आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला सुनील शिंत्रे, अंजनाताई रेडेकर, संभाजीराव देसाई, ऍड बाळासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, विद्याधर गुरबे, अभिषेक शिंपी, बसवराज आजरी, दिग्विजय कुऱ्हाडे, एम. जे. पाटील, सोमगोंडा आरबोळे, राजू खमलेट्टी, नौशाद गुड्डेखान, उदय पाटील, प्रा अनिल कुराडे, जे बी बार्देस्कर, यांच्यासह तीनही तालुक्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.