जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्री आबिटकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी : चुकीचे काम होत असेल, तर हयगय केली जाणार नाही : इशारा ‘

पालकमंत्री आबिटकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी :

चुकीचे काम होत असेल, तर
हयगय केली जाणार नाही : इशारा ‘

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर:
कोल्हापूर ‘फुलेवाडी अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या प्रकरणात संबंधित अभियंता व उपशहर अभियंत्यांना जबाबदार धरून प्रथम निलंबित करा. त्यांची विभागीय चौकशी लावा. ऐन गणेशोत्सवात शहरवासीयांना आठ दिवस पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. हा गंभीर विषय असून, चौकशी समिती नेमून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा. विविध फाईलींमध्ये किरकोळ त्रुटी काढणाऱ्या मुख्य लेखापरीक्षकांवर तसेच कसबा बावडा ड्रेनेजलाईन घोटाळ्यातील वरिष्ठांवर कारवाई करा. बनावट, चुकीचे काम होत असेल, तर हयगय केली जाणार नाही,’ अशा कडक शब्दांत पालकमंत्री प्रकार आबिटकर यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले.


दरम्यान, तज्ज्ञांची तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची समिती नेमून रस्ते, विकासकामांची गुणवत्ता तपासा. शहर विकासासाठी मिशन मोडवर काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी बोलून योग्य सुविधांचे नियोजन १३ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत सादर करण्याचे आदेश प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिले.
पालकमंत्री आबिटकर यांनी आज प्रथमच महापालिकेत सलग साडेतीन तास मॅरेथॉन बैठक घेत विविध विषयांबाबत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. बैठकीत चर्चा करून निघून जाणार नसून पुढे प्रत्येकाची माहिती घेणार. पाट्या टाकण्याचे बंद करून सकारात्मकतेने काम करा; अन्यथा कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला. सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर यांनी १०० कोटींच्या रस्ते कामाची मुदत संपत आली, तरी संथ काम सुरू आहे. त्याची जबाबदारी प्रशासकांची आहे. कुणी काम करत नसेल, तर कारवाई करा. फुलेवाडीच्या प्रकरणात पिलर तुटत असेल, तर गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत आहे. महापालिकेच्या अभियंता, उपशहर अभियंत्यांची देखरेख हवी. पदाप्रमाणे कामही करायला हवे. या प्रकारामुळे रस्त्यांसह साऱ्या कामांची गुणवत्ता तपासली पाहिजे. त्यासाठी समिती नेमावी.

कसबा बावडा ड्रेनेज घोटाळ्यात ठेकेदाराने धाडस कसे केले? त्यात वरिष्ठांपासून जे कुणी असेल त्यांच्यावर कारवाई करा. अधिकार आहेत म्हणजे सर्वेसर्वा झाला नाहीत. त्रास देत असतील, तर मुख्य लेखापरीक्षकांवर कारवाई करा. आमदार राजेश क्षीरसागर यांनी उत्पन्न वाढीसाठी इतकी पत्रे दिली. पण, प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली. जनता आम्हाला दोष देते. प्रशासनावर असलेल्य व्यक्तीचा पगडा थांबवा. आता खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला.
आमदार अमल महाडिक यांनी, शहराची स्थिती पाहता
अधिकाऱ्यांनी गंभीरपणे घ्यावे. कर्मचारी नाहीत हे कारण सांगून काम टाळले जाते. कारवाई केली नाही, तर अधिकारीच जबाबदारीने काम करणार नाहीत, असे सांगितले. सत्यजित कदम यांनी अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर कसबा बावड्याचे भूत असल्याचा आरोप केला. शारंगधर देशमुख, आदिल फरास यांनी खुल्या जागांवरील अतिक्रमणे, सतत बंद पडणारा पाणीपुरवठा, थेट पाईपलाईनचा बिघाड, रिंगरोडची कामे, पार्किंगचा प्रश्न, रस्त्यांची रखडलेली कामे याबाबतही अनेक बाबी उघड केल्या. दरम्यान, लाडपागे कमिटीच्या शिफारशीनुसार काही पात्र वारसांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. तर जिल्हा नियोजन समितीतून अग्निशमन विभागासाठी घेतलेल्या नवीन अग्निशमन वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

शहर अभियंत्यांना दम
संबंधित विभागाचे प्रश्न विचारल्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तरे देण्यासाठी सांगितले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी, ‘निवांत घरात असल्यासारखी उत्तरे अपेक्षित नाहीत. विभागप्रमुख म्हणून तुमच्याकडून उत्तरे हवीत’, असा दम शहर अभियंता रमेश मस्कर यांना दिला.


एप्रिलमध्ये केशवराव भोसले नवीन नाट्यगृहाचे लोकार्पण, बांधकामपरवाना तक्रारींबाबत सहायक संचालकांवर कारवाई करा.

पाणीपुरवठ्यातून मतदान न होणाऱ्या भागाचा बदला घेण्याचा प्रकार

स्क्रॅप चोरीतील मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई करा, ३९ टक्के रिक्त पदांमुळे कामाचा बोजा, कंत्राटी तत्त्वावर आवश्यक कर्मचारी नेमा

डांबरी प्रकल्प बंद करून ठेकेदार पोसतात

काँक्रिट रस्त्यांचा डीपीआर तयार करा, बिंदू चौकातील कारागृह हलवण्यासाठी प्रयत्न, ब्ल्यू लाईनमध्ये येणाऱ्या रिंगरोडसाठी टीडीआर द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button