CJI गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न : वकिलावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा मागणी

CJI गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न : वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मागणी
सिंहवाणी ब्युरो / शिरोळ
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुका आंबेडकरवादी पक्ष व संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावून शिरोळ तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. या घटनेस जबाबदार वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान , यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनात रमेश शिंदे, दिगंबर सकट, बाळासाहेब कांबळे – शिरोळकर , सुरेश कांबळे, विश्वास कांबळे, किरण भोसले, विश्वास बालीघाटे , दगडू माने , अनिल लोंढे ,शिवगोंडा पाटील, खंडेराव हेरवाडे, प्रमोद राणे, अमरसिंह कांबळे , राजेंद्र प्रधान , राजेंद्र दाभाडे, राजाराम कांबळे ,अशोक कांबळे, जयपाल कांबळे, कबीर कांबळे ,भास्कर कांबळे, बाळासो कांबळे – चिपरीकर, बसवराज कांबळे यांच्यासह आंबेडकरवादी पक्ष व संघटना कार्यकर्ते सहभागी झाले होते
निवेदनात म्हटले आहे की, राज्यघटनेचे शिल्पकार ,बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे शोषित ,पीडित व वंचित यासह सामान्य नागरिकाला हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा झालेला प्रयत्न म्हणजे सर्वोच्च संविधानिक पदाचा अवमान झाला आहे. मनुवादी संस्कृती जोपासणाऱ्या वकील राकेश किशोर तिवारी यांनी न्यायव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. राज्य व केंद्र शासनाने न्याय व्यवस्थेला संरक्षण द्यावे. अशी मागणी करून आंबेडकरवादी अनुयायी, भीमसैनिकांनी काळ्या फिती लावून निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.