पडळकर वक्तव्यानंतर जयंत पाटील प्रथमच प्रचंड आक्रमक; सगळ्यांना हाणणार’, चौकशीला घाबरत नाही महिन्याभरानंतर मौन सोडले

पडळकर वक्तव्यानंतर जयंत पाटील प्रथमच प्रचंड आक्रमक;
सगळ्यांना हाणणार’,
चौकशीला घाबरत नाही महिन्याभरानंतर मौन सोडले
सिंहवाणी ब्युरो : सांगली
‘ गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिल राजारामबापू पाटील यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तब्बल एका महिन्यानंतर जयंत पाटलांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यात सुरू झालेला राजकीय संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. अशातच गेल्या महिनाभरापासून गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मौन धरलेल्या आमदार जयंत पाटील अखेर आपले मौन सोडले आहे.
‘माझ्या आई-वडिलांबाबत वाईट बोललेलं जिल्ह्यातील लोकांना आवडलेलं नाही. योग्य वेळ येईल त्यावेळी त्यावर मी बोलणार आहे. पण सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही.’, अशा शब्दात जयंत पाटील इशारा दिला. इस्लामपूरमधील एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजारामबापू पाटील यांच्याबाबत अपशब्द काढले होते. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. भाजप आणि जयंत पाटील असा संघर्ष सुरू झाल्यानंतर ही जयंत पाटील यांनी गेल्या महिनाभरापासून या वक्तव्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र एका मुलाखतमध्ये त्यांनी यावर भाष्य केले आहे.
‘एखाद्याच्या आई-वडिलांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांच्या पाठीशी राहून त्याबाबत सभा घेतली जाते. हे भाजपला कसे काय मान्य आहे, याबाबत आश्चर्य वाटते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या व्यक्तीला काय समज दिली. हा प्रश्न मला पडला आहे. आमच्या सभेत दोघा-तिघांनी टीका केली त्याचा समर्थन मी करणार नाही. पण आमच्यावर झालेली टीका ही जनतेला आवडलेली नाही त्याचे उत्तर आम्ही निवडणुकीत देऊ’, असे देखील जयंत पाटील म्हणाले.
चौकशीला घाबरत नाही
भाजपच्या नेत्यांनी या सभेत मला चौकशीचा इशारा दिला. त्यांनी ती चौकशी बिनधास्त करावी मी कोणत्याही चौकशीला समोर जाण्याची तयारी ठेवली आहे. कोणत्याही चौकशीला आपण घाबरत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.