थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, : दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार

थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, :
दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार
सिंहवाणी ब्युरो / मुंबई:
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी वेगवेगळ्या 18 संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. सोमवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होणार असून आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात रविवारी कृती समिती मधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कृती समिती मधील हणमंत ताटे, श्रीरंग बरगे, संदीप शिंदे, हिरेन रेडकर, पांडुरंग वाघमारे, दादाराव डोंगरे, बंडू फड, संतोष गायकवाड, राजेंद्र मोजाड, विनोद गजभिये, अरुण वीरकर, गौतम कांबळे, विश्वनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
एसटीमधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील 16 संघटना व अन्य एक महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनानी सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पासून आंदोलनाची नोटीस दिली आहे. आता हे आंदोलन मुंबई सेंट्रल ऐवजी आझाद मैदानावर होणार आहे.
दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे. त्यामध्ये थकीत देणी रक्कम हप्ता सुरू करण्यात आला नाही तर धरणे व ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू राहील असेही कृती समितीच्या बैठकीत ठरले..
काय आहेत मागण्या?
2018 पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नसून सन 2020 ते 2024या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत असून एकूण 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेने मशाल मोर्चा व ठिय्या आंदोलनाची वेगळी नोटीस दिली होती. पण आर्थिक मागण्यांचे स्वरूप सारखेच असल्याने सदरची नोटीस मागे घेण्यात आली असून कृती समितीच्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.