भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकांची दिवाळी गोड होणार: आयुक्त डॉ.सुहास दिवसे यांच्याबरोबर राज्यातील संघटनांची बैठक;

भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकांची दिवाळी गोड होणार:
आयुक्त डॉ.सुहास दिवसे यांच्याबरोबर राज्यातील संघटनांची बैठक;
सिंहवाणी ब्युरो / पुणे :
राज्यातील सर्व भूमिअभिलेख विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांची दिवाळी गोड होणार असून,त्यांना लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे सूतोवाच खुद्द या विभागाचे आयुक्त डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
राज्यातील भूमिअभिलेख विभागात कार्यरत असलेले कर्मचारी विशेषत: भूकरमापक यांनी गेल्या अनेक वर्षापासून इतर विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागत होते. यासाठी राज्यातील विविध संघटनांनी वारंवार आंदोलने तसेच बेमुद्त संप केल होते.मात्र यावर कधीच तोडगा निघाला नाही. मात्र जुलै महिन्यात महाराष्ट्र राज्य भूमीअभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी सलग बेमुदत संप केला. त्यावेळी आयुक्त डॉ.दिवसे यांनी या संघटनेच्या पदाधिका-याबरोबर मध्यस्थी केली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला होता.
दरम्यान सोमवारी (दि.13)आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ.दिवसे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग, नाशिक विभाग, कोकण प्रदेश,विदर्भ विभाग,छत्रपती सभाजीनगर या विभागातील संघटना तसेच कास्ट्राईब भूमिअभिलेख संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनांचा पदाधिका-यांबरोबर बैठक झाली. या बैठकीस आयुक्त डॉ.दिवसे यांच्यासह अप्पर जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारे, उपसंचालक राजेंद्र गोळे, उपसंचालक कमलाकर हट्टेकर, महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागाचे अध्यक्ष विजय पिसाळ, सरचिटणीस अजित लांडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आकृतीबंध तसेच भूकरमापकांना लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव राज्यशासनाकडे असून,तो अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार भूकरमपाक ‘एस-6 या वेतनश्रेणीमधून ‘एस-8’ या वेतनश्रेणीमध्ये जाणार आहेत. त्यामुळे सुमारे सध्या बेसिक (एस-6) वेतन 19 हजार आहे.तेच( एस-8) वाढ होऊन 25 हजार 200 (बेसिक ) पोहचणार आहे. याबरोबर कर्मचा-यावर कामाचा जास्त ताण असल्यामुळे खासगी भूकरमापकांची नेमणूक होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील भूकरमापकांना व्हर्जन 2.0 चे प्रशिक्षण मिळणार आहे. नव्याने रोव्हर, लॅपटॉप भूकरमापकांना देण्यात येणार आहेत.
भूमिअभिलेख विभागाचे आयुक्त डॉ.सुहास दिवसे यांच्याबरोबर राज्यातील सर्व भूकरमापक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सुधारित वेतनश्रेणी आणि आकृतीबंध लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. नवीन वेतनश्रेणी महिनाभरात लागू होणार असल्याबाबत सूतोवाच करण्यात आले.
अजित लांडे-
सरचिटणीस- महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना पुणे विभाग