मनसेच्या जिल्हाध्यक्षांचे खड्यात आंघोळ करून आंदोलन! अखेर अनोख्या आंदोलनानंतर गडहिंग्लजला खड्डे बुजविले

मनसेच्या जिल्हाध्यक्षांचे खड्यात आंघोळ करून आंदोलन!
अखेर अनोख्या आंदोलनानंतर गडहिंग्लजला खड्डे बुजविले
सिंहवाणी ब्युरो /गडहिंग्लज :
चंदगड राज्यमार्गावर गडहिंग्लज ते भडगाव दरम्यान खड्ड्यांचे मोठे साम्राज्य पसरले असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता येत्या काळात नव्याने होणार असल्याने शासकीय यंत्रणेने या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे मनसेने जोरदार आंदोलन करीत चक्क खड्ड्यात बसून दिवाळीचे अभ्यंगस्नान केले. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी स्वतः या ठिकाणी आंघोळ केल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांची तारांबळ उडाली. या अनोख्या आंदोलनाची कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
गडहिंग्लज शहरातील वर्दळीच्या मार्गावर संबंधित खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी करण्यात येत होती. मनसेनेही अधिकाऱ्यांना इशारा देत येथील खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी चालढकल करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याने अखेर नागेश चौगुले यांनी या ठिकाणी अभ्यंगस्नान करण्याचे अनोखे आंदोलन केले. त्यांनी रस्त्यातच खड्यात बसून आंदोलन केल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली शिवाय या अनोख्या आंदोलनाची वेगळी चर्चा झाली. आंदोलनाने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलनाचे स्वरूप कळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी पाचारण आले. आंदोलनानंतर या ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. मनसेने खड्यांमध्ये मुरूम टाकून केलेल्या अनोख्या आंदोलनाने खड्डे बुजविले गेले.या वेळी संदीप रिंगणे, गजाभाऊ सासणे चितन चिमणे रविंद्र कोडोली दयानंद पट्टणकुडी विनायक खोत रमजान मुल्ला गुरुरिंगणे शिवराज पनोरे महादेव बाडकर इकबाल शायन्नावर यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
*अनोखे आंदोलन अन समस्यांची सोडवणूक!*
मनसेने शहरातील धोकादायक स्थितीतील होर्डिग्ज हटविण्यासाठी नागेश चौगुले यांनी थेट उंच होर्डिग्जवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते त्यामुळे प्रशासनाने होर्डिग्ज हटविले होते. त्याच पद्धतीने रस्तातील खड्डे मुजविण्यासाठी केलेले अभिनव आंदोलन चर्चेत सापडले आहे.