अकोळ व पांगीर परीसरात तंबाखू पिकावर खोड कुज रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव- प्रा. पी. डी. शिरगावे

अकोळ व पांगीर परीसरात तंबाखू पिकावर खोड कुज रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव- प्रा. पी. डी. शिरगावे
सिंहवाणी ब्युरो / निपाणी
देवचंद महाविद्यालयातील शेती रसायने आणि कीड व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक पी. डी. शिरगावे, सोनाली कुंभार, अमृता गोंधळी व शेती रसायने आणि कीड व्यवस्थापन विषयाच्या विद्यार्थ्यांनी अकोळ – पांगीर परीसरात तंबाखू शेतीमध्ये सर्वेक्षण केले असून, यामध्ये या परीसरातील तंबाखू पिकावर खोड कुज(सॉफ्ट रॉट) या रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे.
अकोळ, ममदापुर, गळतगा, खडकलाट, कोडणी, कापशी इत्यादि गावांमध्ये तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. सदर गावांमध्ये शेतीच्या मातीमध्ये तंबाखूसाठी पोषक अन्नद्रव्य असल्यामुळे तंबाखूचे गुणधर्म आणि गुणवत्ता चांगली असते. तंबाखू हे अत्यंत महत्वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परंतु अलीकडे तंबाखू पिकावरती अनेक प्रकारचे रोग येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कडक्या, मर, बेडकीचे डोळे आढळतात. अनेक प्रकारचे कीड त्यामध्ये, मावा, पान खाणारी अळी, इत्यादींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत आहेत आणि ते रासायनिक किटनाशकांनापण दाद देत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये रासायनिक किटनाशकांविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे.
सद्या अकोळ – पांगीर परिसरामध्ये तंबाखू पिकावर खोड कुज हा रोग मोठ्या प्रमाणात आढळत असून जीवाणूंचे परिणाम दिसून येत आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः पेक्टोबॅक्टेरीयम कॅरोटोवोरम या जीवाणूमार्फत होतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. सुरुवातीला खोडावरती काळे डाग दिसतात. त्यानंतर जीवाणू खोडाच्या आतमध्ये शिरकाव करतो व आतील भाग कुजण्यास सुरुवात होते. पहिले दोन महिने याची लक्षणे दिसत नाहीत. पण नंतर पाने कुजण्यास सुरुवात होते. खोड पोकळ होऊन त्यातून कुजट वास येऊ लागतो. आणि पूर्ण खोड आपोआप तुटून पडते. या रोगाचा प्रसार पाण्याद्वारे अत्यंत जलद होतो आणि संपूर्ण शेतीमध्ये पसरतो, यामुळे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी तंबाखूची झाडे लहान असतानाच या रोगाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
रोगाची लक्षणे
पानावरील कुजलेल्या शिरा
1. खोडावरील लक्षणे
रोगाची सुरुवात सामान्यतः पानांच्या देठाच्या जोडाजवळ किंवा जखमी भागांपासून होते.
सुरुवातीला त्या भागावर पाणचट, मऊ आणि तपकिरी डाग दिसू लागतात.
हळूहळू खोडाचा आतील भाग मऊ होऊन कुजतो व दुर्गंधी येऊ लागते.
खोड आतून तपकिरी, चिकट आणि पाणचट पदार्थासारखे दिसते.
खोडाचा मध्यभाग पूर्णपणे कुजतो व खोड पोकळ होऊन पूर्णपणे कोसळते.
2. पानांवरील लक्षणे
संक्रमित भागाजवळील पाने पिवळी पडतात, नंतर वाळून मरतात.
देठाचा तळ संक्रमित होऊन, पूर्ण पान जमिनीच्या दिशेने झुकते.
देठाच्या तळाशी मऊ, पाणचट, तपकिरी कुजलेले डाग दिसतात.
संक्रमित भागातून दुर्गंधी (कुजका वास) येतो.
रोग वाढीस अनुकूल घटक
या रोगाचा प्रसार पेक्टोबॅक्टेरीयम कॅरोटोवोरम या जिवाणूमुळे मातीतून व पाण्यामार्फत होतो.
जास्त आर्द्रता आणि 25-35°C तापमान या स्थितीत रोग वेगाने वाढतो.
रोगाने संक्रमित पानाचा देठ
जखमा, कीटकांचा प्रादुर्भाव, किंवा लागवडीदरम्यान झालेले नुकसान हे रोगास अनुकूल ठरते.
नत्रयुक्त खतांचा अति वापर आणि पिकांची दाट लावण.
ओळखण्याचे वैशिष्ट्य
संक्रमित भाग पाण्यात ठेवले असता, पाण्यात दुधासारखे धागे (bacterial ooze) बाहेर येताना दिसतात.
हा जीवाणू पेक्टोलीटिक एंझाइम्स तयार करतो, ज्यामुळे वनस्पती ऊतकांची पेशीभित्ती विघटित होऊन मऊ कुज होते आणि दुर्गंधी येत
कुजून पोकळ झालेले खोड
रोगाचे व्यवस्थापन
1. प्रतिबंधात्मक उपाय:
स्वच्छ व रोगमुक्त बियाणे वापरणे.
पाण्याचा निचरा चांगला असलेली जमीन निवडणे.
लागवडीपूर्वी शेतीची योग्य नांगरणी व सेंद्रिय खतांचा वापर करणे (ट्रायकोडर्मा किंवा प्स्यूडोमोनास मिश्रित खत).
रोगग्रस्त झाडे किंवा भाग तत्काळ काढून जाळून टाकणे.
लागवडीदरम्यान स्वच्छ साधने वापरणे.
आळीपाळीने पीक घेणे. (Crop rotation) करा. सलग तंबाखू किंवा सोलानॅसी कुळातील पिके घेऊ नये.
2. कल्चरल उपाय (Cultural Practices):
जमिनीतील ओलावा नियंत्रित ठेवणे. अति सिंचन टाळणे.
पिकात योग्य हवेचा प्रवाह राहील अशी लागवड करणे (झाडांमध्ये योग्य अंतर ठेवा).
जैविक खते (उदा. ट्रायकोडर्मा विरिडे, प्स्यूडोमोनास फ्लुरेसन्स) मातीमध्ये मिसळणे .
रोगग्रस्त भागाजवळ नायट्रोजनयुक्त खतांचे अतिवापर टाळणे.
3. रासायनिक नियंत्रण (Chemical Control):
प्रारंभीच्या अवस्थेत कॉपर ऑक्सीक्लोराईड (Copper oxychloride) @ 0.3%
बोर्डो मिश्रण (Bordeaux mixture) 1%
किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन + कॉपर ऑक्सीक्लोराईड मिश्रण फवारणी (स्ट्रेप्टोसायक्लिन 100 ppm + कॉपर ऑक्सीक्लोराईड 0.3%)
फवारणी ७–१० दिवसांच्या अंतराने २–३ वेळा करावी.
4. जैविक नियंत्रण (Biological Control):
प्स्यूडोमोनास फ्लुरेसन्स किंवा ट्रायकोडर्मा. या उपयुक्त सूक्ष्मजीवांचे मातीमध्ये वापर केल्यास रोगावर नियंत्रण मिळते.
हे सूक्ष्मजीव रोगकारक जीवाणूंशी स्पर्धा करून त्यांच्या वाढीस आळा घालतात.
5. रोगानंतरचे व्यवस्थापन (Post-Infection Management):
अति संक्रमित झाडे काढून टाकून नष्ट करणे.
शेतीची उपकरणे निर्जंतुक करणे (0.1% ब्लीचिंग पावडर किंवा फॉर्मालिन द्रावण वापरून).
पुढील हंगामासाठी रोगमुक्त बियाणे व निरोगी रोपे वापरणे.

शेतकऱ्यांना रोग नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती सांगताना सांगताना प्रा. पी. डि. शिरगावे.

