शतकवीरांशी थेट संवाद…!

शतकवीरांशी थेट संवाद…!
भुदरगडला जशी ऐतिहासिक परंपरा आहे. त्याच पद्धतीने स्वातंत्र्यलढयात या तालूक्यातील अनेकांनी बलिदान दिल्याने कांतीकारकांची भूमी अशी एक ठळक ओळख आहे. या तालूक्यावर निसर्गाचेही वरदान लाभले आहे. गारगोटी येथे जागतिक किर्तीचे शिक्षण तज्ञ डॉ. जे.पी. नाईक यांनी मौनी विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या या तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचले आहे. या तालुक्यातील पाटगाव येथे मौनी महाराजांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या युद्धासाठी जाताना मौनी महाराजांचे आशिर्वाद घेऊन गेले होते ही पार्श्वभूमीदेखील ऐतिहासिक दृष्टया महत्वाची आहे. अशा या तालुक्यात ज्येष्ठ पिढीतील हिंदूराव आबिटकर हे आपल्या वयाच्या १०० व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. या संवादात त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजच्या काळापर्यंत काही गोष्टीबाबत आपली भुमिका मांडली.
महात्मा गांधी यांना पाहण्याचा योग मला मिळाला. ही माझ्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. कोल्हापूरला सभेसाठी आले असता. मी मुद्दाम त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या भाषणाचा प्रभाव संपूर्ण जनतेवर होत होता. तसाच प्रभाव माझ्यावरही झाला. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालीच देशाला स्वातंत्र्य मिळाले अशा एका थोर विभुतीला पाहण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्यपूर्व काळ खूप अडचणीचा होता. ब्रिटीशांचे राज्य, त्यांची बंधने, खुलेपणाने जीवन जगता येत नव्हते. त्यांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर आपल्या देशातील जनतेला खुलेपणा मिळाला. स्वातंत्र्य मिळाले. सर्वार्थानी जीवनात खूप मोकळेपणाने आता आम्ही जगतो आहोत. आपल्या जीवनाच्या वाटचाली बद्दल बोलताना ते म्हणाले मी साधा शेतकरी कुटुंबातील सातवी पर्यंत शिक्षण झालेले, नोकरी करण्यापेक्षा मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून विविध प्रकारची कामे घेत होतो. अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत होतो. मी रस्त्यांची कामे केली. डांबरी रस्त्यावर तीन वर्षाच्या काळात एकही खड्डा पहायला मिळायचा नाही.
अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेने जीवन जगलो. डॉ. जे. पी. नाईक यांनी मौनी विद्यापीठाची उभारणी केली त्यातील इमारतीचे बांधकाम करण्याची संधी मला मिळाली. प्रामाणिकपणामुळेच माझ्यावर ही जबाबदारी आली. यातूनच डॉ. जे.पी. नाईक यांच्याशी अगदी जवळचे संबंध आले. रोज भेटीगाठी होत असत. त्यांचे बोलणे ऐकत रहावे असे वाटत होते. वेगवेगळया प्रश्नांबाबत ते मार्गदर्शन करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळ जसा पाहिला त्याच बरोबर आता गेल्या ७५ वर्षापासून स्वतंत्र भारतात लोकशाही पद्धतीने जगताना एक वेगळे समाधान आणि वेगळा आनंद मिळत असतो.

माझ्या जीवनशैलीबाबत बोलायचे तर अत्यंत साधी राहणी आजपर्यंत कायम ठेवली आहे. सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याची आणि समाजातील सर्व घटकांशी सतत संपर्क ठेवण्याची माझी सवय त्यामुळे मित्रपरिवारही खूप व्यापक आणि वेगवेगळ्या स्तरातील राहणीमान साधे त्याचप्रमाणे जेवणही अत्यंत साधे. शेतकरी कुटुंबात असलेल्या भाजीभाकर हेच आमचे पक्वान होते. आजही त्याचपद्धतीने शरिराला जेवढी गरज आहे. तेवढेच जेवण घेतो. आज १०० व्या वर्षांत पदार्पण करीत असताना मागे वळून पाहताना आपण खूप चांगले आयुष्य जगलो. याचे एक वेगळे समाधान मिळते. पूर्वीच्या काळात एकमेकांना मदत करण्याची भावना होती. यातून सामाजिक ऐक्य बांधले जायचे. अडचणीच्या वेळी कसलाही विचार न करता मदतीसाठी सारे धावून जायचे आज परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. पूर्वीसारखे समाजात ऐक्य नाही. एकमेकांबद्दल प्रेम नाही. एकत्र कुंटुंब पद्धती खूप चांगली होती. आज त्याला घरघर लागली आहे. माणुसकी गेली तरी कुठे असा प्रश्न कधीकधी माझ्या मनात येतो.
अत्यंत साधी राहणी नियमित व्यायाम म्हणण्यापेक्षा कष्ट, सकारात्मक विचार आणि समाजातील सर्व घटकाबरोबर आपूलकीने वागण्याची सवय यामुळेच या टप्प्यापर्यंत आलो. कौटुंबिक स्तरावर जसे समाधान आहे. त्याच पद्धतीने समाजात वावरातानाही सर्वाकडून आपूलकीची वागणूक मिळते. याचे कारण माझा स्वभाव आणि माझी जीवनशैली खूप महत्वाची आहे. सर्वार्थाने मी खूप समाधानी आणि आनंदी आहे. समाजाबद्दल कृतज्ञा आहे. १०० व्या वर्षात पदार्पण करताना एकच गोष्ट मला नमुद करायची आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र राहून सामाजिक ऐक्य जपले तरच समाज पूढे जाऊ शकेल.
सुभाष घुमे. ज्येष्ठ पत्रकार
गडहिंग्लज