जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तोडगा निघेपर्यंत ऊस तोड बंद…युवा ऊस उत्पादकांचा निर्णय.. शिरोळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद… सोमवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा…

तोडगा निघेपर्यंत ऊस तोड बंद…युवा ऊस उत्पादकांचा निर्णय..
शिरोळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…


सोमवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा…

सिंहवाणी ब्युरो / सचिन इनामदार, शिरोळ
शिरोळ गावात ऊस दराच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना ऊस दराचे आंदोलन करत असताना कारखाना समर्थकांनी धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ आज 1 नोव्हेंबर रोजी शिरोळ गाव बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या आवाहनाला शिरोळ गावातील नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण शिरोळ गाव कडकडीत बंद पाळण्यात आले आहे.


त्यातच आज सकाळी 11 वाजता शिरोळ व परिसरातील युवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची छ. शिवाजी तख्त शिरोळ येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे, स्वाभिमानीचे सौरभ शेट्टी, यशवंत उर्फ बंटी देसाई, दिपक पाटील, राकेश जगदाळे, प्रदीप जाधव, धिरज शिंदे, सचिन सूर्यवंशी, महेश जाधव यांनी आपापले विचार व्यक्त केले.
यावेळी एकमुखाने ऊस दराचा तोडगा निघे पर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकरी, पक्ष, संघटना यांनी एकत्र येऊन सर्व ऊस तोंडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत सर्व उत्पादक शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. धनाजी चुडमुंगे यांना झालेल्या मारहाणीचा यावेळी निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना.उल्हास दादा पाटील म्हणाले, आंदोलन कोण करत आहे याला महत्व नाही, तर आंदोलन कशासाठी होत आहे याला महत्व आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा ऊस आंदोलनाचा लढा द्यायचा आहे. त्याचबरोबर चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध करून, ही घटना अतिशय चीड आणणारी आहे. कारखाना व्यवस्थापनाने मारहाण करायला रस्त्यावर यायचं काही कारण नाही, त्यांनी त्यांचं काम कारखान्याच्या मिटिंग हॉल मध्ये करावं असंही ते म्हणाले.
प्रगतशील शेतकरी बंटी देसाई म्हणाले, स्वाभिमानी व अंकुश या दोन्ही संघटनानी एकत्र येऊन समस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देण्याची गरज आहे. आम्ही ऊस उत्पादक शेतकरी तुमच्या मागे ठाम आहे. मतदारांना पैसे वाटताना कारखानदारांची इर्षा असते पण, उसाचे पैसे देताना मात्र ही इर्षा दिसूनयेतनाही. सगळ्या कारखान्यांची रिकव्हरी, तोडणी वाहतूक वेगळी असताना एकच दर यांचा निघतोय कसा…?

स्वाभिमानीचे युवा नेते सौरभ शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले, काल झालेली घटना म्हणजे बऱ्याच वर्षानंतर दंडूकशाहीचा पुरावा पुन्हा एकदा दिसून आला आहे, आणि तो जर थांबवायचा असेल तर, पुन्हा एकदा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा लढण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button