गारगोटी भुदरगड परिसरात विमानाच्या रहस्यमय चकरा : जनतेत तर्कवितर्क मौल्यवान खनिज शोधण्यासाठी मोहीम ❓

गारगोटी भुदरगड परिसरात विमानाच्या रहस्यमय चकरा : जनतेत तर्कवितर्क
मौल्यवान खनिज शोधण्यासाठी मोहीम ❓
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गारगोटी शहर ते भुदरगड किल्ला परिसरातील आकाशात मोठ्या आकाराच्या विमानाच्या सुमारे एक ते दीड तास घिरट्या सुरू असल्याने या परिसरातील रहिवाशी अचंबीत झाले. भात कापणीचा सीजन असल्याने बहुतांशी लोक शेतात काम करीत होते. या काळातच या चकरा झाल्याने लोकांच्या नजरा कशाकडे लागून राहिल्या होत्या ही विमान का घिरट्या घालते आहे याचे तर्क वितर्क लावले जात होते. दोन दिवस गावागावात या चर्चेला ऊत आला. हे विमान नेमके काय शोधत होते? आणि त्याचे रहस्य काय? असा सवाल करण्यात येत होता. याबाबत सिंहवाणी कार्यालयास अनेकांचे फोनही आले.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की मंगळवार दिनांक 4 रोजी 11 ते 12 च्या दरम्यान एक विमान तीन ते चार चकरा मारून गेले. त्यावेळी लोकांच्या नजरा आकाशाकडे गेल्या होत्या मात्र त्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. पण काल बुधवारी हेच विमान याच वेळी सुमारे दीड तास या परिसरात चकरा मारू लागले. यावेळी संपूर्ण शिवारात भात कापणीची सुगी सुरू असलेले शेतकरी आणि रहिवाशांच्या नजरा या विमानाकडे वळल्या.
प्रथम या विमानाने दक्षिण उत्तर अशा आठ ते दहा चकरा मारून झाल्यावर पूर्व पश्चिम अशा 15 ते 20 चकरा मारल्या. दक्षिण उत्तर फेऱ्या मारताना हे विमान गारगोटी पासून भुदरगड किल्ल्यापर्यंत जात होते. तिथून परत येत होते. पूर्व पश्चिम फेऱ्या मारताना ते वेदगंगा नदी ते पालीचा कडा या अंतरात फिरत होते.
विमान खूपच खाली म्हणजे पाच हजार फूट उंचीवरून जात असल्याने ते मोठे व स्पष्ट दिसत होते. शिवाय त्याचा वेग ही नेहमीपेक्षा खूपच कमी होता. या विमानाच्या पाठीवर मोठ्या आकाराचा बॉक्स ठेवण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते.
विमान नेमके काय शोधत होते असा प्रश्न जनतेला पडला.
गेल्या काही वर्षांपूर्वी याच परिसरात एक हेलिकॉप्टर एक मोठी अँटिना घेऊन फिरत होते. त्यावेळी सिंहवाणीने अनेक ठिकाणी चौकशी करून वृत्त प्रसारित केले होते. या परिसरात मौल्यवान खनिजे युरेनियम, सोने आदींचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.
आता विमानाच्या रहस्यमय चकरा त्यासाठीच असाव्यात, या तर्काला पुष्टी मिळत आहे. मात्र इथे मौल्यवान खनिजांचा शोध लागल्यावर हा भाग अडाणीच्या घशात जाईल का? आणि अडाणी पुरस्कृत हा तपास चालू आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. एक तर या तालुक्यातील पाटगाव प्रकल्प अडाणी गिळून कृत करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यातच या भागात अशा पद्धतीने मौल्यवान खनिजाचा शोध लागला तर अडाणीचा डोळा त्याच्यावर निश्चितच राहण्याची शक्यता आहे.