आंबेगाव व जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ ; शेतकऱ्याने थरार अनुभवला तर दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

आंबेगाव व जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ ;
शेतकऱ्याने थरार अनुभवला तर दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
सिंहवाणी ब्युरो / पुणे :
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी परिसरात आता सूर्योदयासोबतच बिबट्यांचे दर्शन होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बिबट्यांची संख्या व वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल शुक्रवारी देखील ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!’चा थरार येथील लोलेवस्तीतील दिगंबर लोले या शेतकऱ्याने अनुभवला.
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लोले हे लोलेवस्तीतील बैलगाडा शर्यत घाटाजवळ त्यांच्या शेतात जनावरांना मका चारा काढण्यासाठी गेले होते. या वेळी अचानक 100 फूट अंतरावर मका पिकात हालचाल जाणवली. त्यांनी नीट पाहिले असता एक प्रौढ बिबट्या उभा असल्याचे दिसले. लोले यांनी बिबट्याला पाहताच भीतीने खाली बसून घेतले. नंतर शेजारील शेतातील लोकांना आवाज दिला. हा आवाज ऐकताच बिबट्या शांतपणे डोंगराच्या दिशेने निघून गेला. लोले म्हणाले, ‘मी बिबट्याला पाहिले, पण त्याने मला पाहिले नाही. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.’
जारकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. ढोबळेवाडी दर्यात देखील एका बिबट जोडीला ग््राामस्थांनी पाहिले असून, त्या ठिकाणी वन विभागाने आधीच पिंजरा लावलेला आहे. या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांसाठी हे ठिकाण अनुकूल ठरत आहे. वनरक्षक पूजा कांबळे यांनी सांगितले की, ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बैलगाडा शर्यत घाट परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात येईल.’
वडगाव आनंदला दुचाकीवरील तरुणावर हल्ला
दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथे घडली आहे. मात्र तरुणाने प्रसंगावधान राखत चपळईने बिबट्याची झेप हुकवल्याने तरुण थोडक्यात बचावला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार (दि. 6) रात्री नऊ वाजता घडली. प्रणव संदीप शिंदे (वय 19) हा तरुण दुचाकीवरून आळेफाटा येथून घरी जात होता. वडगाव आनंद शिवारातील रानमळा येथे तो पिंपळगाव जोगा धरणाचे कालव्याचे रस्त्यावर आला. त्यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे तरुणावर हल्ला केला. या वेळी प्रणव दुचाकीवरून खाली झुकला, यामुळे तो बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला.
बिबट्याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी झुकल्याने प्रणव दुचाकीवरून खाली पडला होता. यात तो किरकोळ जखमी झाला आहे. त्याही स्थितीत त्याने दगड हातात घेत बिबट्याकडे भिरकावल्याने बिबट्या काही अंतरावर गेला. त्यानंतर नातेवाइकांना माहिती दिली. त्यानंतर त्याचे नातेवाइक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनाही घटनास्थळापासून काही अंतरावरच बिबट्या दिसला. या वेळी सर्वांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून निघून गेला. याच परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे नागरिक सांगतात. तसेच आळेफाटा येथेही कालव्यालगत बिबट्या दिसत असल्याचे नागरिक सांगतात.