मातंग समाजातील ज्येष्ठ नेते विष्णू पाटोळे व कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन- सोलापुरात दलित पँथर चा इशारा

मातंग समाजातील ज्येष्ठ नेते विष्णू पाटोळे व कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन·
– सोलापुरात दलित पँथर चा इशारा
सिंहवाणी ब्युरो / महेश गायकवाड, अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील जेष्ठ आंबेडकरी नेते आणि मातंग समाजामधील जेष्ठ आणि वयोवृद्ध नेते विष्णू पाटोळे व त्यांच्या मुलांस शेती हडप करण्याच्या उद्देशाने नागू कुंभार आणि सीमा कुंभार व प्रथमेश कुंभार ताराबाई कुंभार यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून गाव सोडून जाण्यासाठी त्रास दिला जात आहे त्यामुळे कुंभार यांच्या वर ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करण्यात यावी आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा दलित पँथर चे अध्यक्ष पँथर बंडू दशरथ गवळी यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनग म्हटले आहे की, पीडित कुटुंबास तातडीने न्याय दिला जावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन करण्यात येईल. मातंग समाजातील विष्णू पाटोळे यांच्या वर आणि त्यांच्या कुटुंबावर नागू कुंभार व त्यांच्या साथीदार लोकांकडून तीन ते चार वेळा अन्याय अत्याचार करण्यात आला आहे. तरीही कोणतीही कारवाई आरोपीवर करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिस निरीक्षक दीपक भिताडे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
विष्णू पाटोळे यांच्या मुलास स्वामी पाटोळे यांच्यावर पोलिस निरीक्षक दीपक भिताडे यांनी मनात द्वेष बाळगून 7 नोव्हेंबर रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून जाणून बुजून खोटी केस करून जेल मध्ये डांबले आहे.
शिवाजी पाटोळे या या तरुणास कुंभार कुटुंबाने लोखंडी रॉड व सळई आणि लोखंडी पाईप ने बेदम मारहाण केली आहे.
हातावर पाठीवर बेदम मारहाण करून पाटील कुटुंबास जाती वाचक शिवीगाळ करून पाटोळे यांच्या घरातील महिलांशी असभ्य वर्तणूक करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसेच गाव सोडून निघून जाण्याची धमकी दिली आहे. याबाबत कुंभार यांच्या वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिनांक 10ऑक्टोबर 25 रोजी करण्यात आली होती, परंतु आरोपी वर गुन्हा दाखल न करता उलट मातंग समाजाच्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. मातंग समाजाच्या व्यक्तीवर आणि कुटुंबावर 3 ते 4 वेळा अन्याय झाला आहे तरीही पोलिस खाते दखल घेत नाही. दलित समाजाच्या विरोधात काम करत आहे खाकी वर्दीचा अक्कलकोट मध्ये गैरवापर केला जात आहे. यामुळे पोलिस खात्याची बदनामी जनतेत होत आहे. पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांची सखोल चौकशी सी आय डी मार्फत केली जावी आणि त्यांना अटक करून निलंबित करण्यात यावे असे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विष्णू पाटोळे यांच्या पत्नी पुष्पा बाई विष्णू पाटोळे यांच्या नावावर सरकार कडून मिळालेल्या असलेल्या 3.6 हेक्टर जमीन वर अतिक्रमण करून सोलार प्लांट बसवून जमीन हडप करण्याच्या उद्देशाने सोलार कंपनीचे मालक दिग्विजय देशमुख याने शेती हडप करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे 20 सप्टेंबर 25 रोजी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही. विष्णू पाटोळे यांच्या मुलाने स्वमालकीच्या शेताचे कागदपत्रे पोलिसाना दाखवून ही देशमुख यांच्या वर कारवाई न करता उलट स्वामी पाटोळे आणि त्यांचा भाऊ शिवाजी पाटोळे यांच्या वरच गुन्हे दाखल करण्यात येऊन त्रास दिला जात आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र हलगी नाद आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा या निवेदनात दलित पँथर चे जिल्हा अध्यक्ष बंडू दशरथ
गवळी यांनी दिला आहे