नितीशराज जाणार; NDAची झोप उडवणारे एक्झिट पोलचे आकडे: एक्झिट पोल खरा ठरल्यास तेजस्वी यादव पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री

नितीशराज जाणार; NDAची झोप उडवणारे एक्झिट पोलचे आकडे:
एक्झिट पोल खरा ठरल्यास तेजस्वी यादव पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री
वृत्तसंस्था / पाटणा / बिहार:
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यावर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार राज्यात सत्ताधारी एनडीएला यश मिळताना दिसत आहे. जवळपास सगळेच एक्झिट पोलचे आकडे राज्यात एनडीए सरकार कायम राहील असा अंदाज वर्तवताना दिसत असताना एका एक्झिट पोलनं तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वातील महागठबंधनची सत्ता येईल अशी शक्यता वर्तवली आहे. हा एक्झिट पोल खरा ठरल्यास तेजस्वी यादव पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात
बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण झाल्यावर एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार 20 वर्षांनंतर नितीश कुमार यांची सत्ता खालसा होताना दिसत आहे.
Journo Mirror नं महागठबंधनला 135 ते 145 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. तर नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वातील एनडीएला 90 ते 100 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला 3 ते 4 जागा, तर अन्य पक्षांना 0 ते 3 जागा मिळतील अशी शक्यता आहे.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी 122 जागा जिंकणं गरजेचं आहे. बिहारमध्ये 2020 मध्ये एनडीएनं काठावरचं बहुमत मिळवलं. एनडीएला १२५ जागा मिळाल्या होत्या. दिल्लीत एनडीएचा भाग असलेल्या लोक जनशक्ती पक्षानं राज्यात एनडीएमधून बाहेर पडत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. तो जेडीयूला महागात पडला. जेडीयूला केवळ 43 जागा मिळाल्या. लोक जनशक्ती पक्षानं जेडीयू विरोधात उमेदवार दिले. मत विभाजन झाल्यानं जेडीयूचे 25 ते 30 उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे जेडीयू 71 वरुन 43 वर घसरला.
यंदा लोक जनशक्ती पक्ष राज्यात एनडीएचा भाग आहे. त्याचा फायदा जेडीयूला होताना दिसत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये जेडीयूला 60 पेक्षा अधिक जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे लोजप एनडीएत आल्यामुळे जेडीयूची गाडी सुसाट सुटली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.