जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंदा’ नव्हे, आता ‘तारा’! : सह्याद्रीत दाखल झालेल्या वाघिणीचे नव्याने बारसे. : एक हजार किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आगमन

चंदा’ नव्हे, आता ‘तारा’!
सह्याद्रीत दाखल झालेल्या वाघिणीचे नव्याने बारसे.


एक हजार किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आगमन

सिंहवाणी ब्युरो / चांदोली/ कराड :
राज्यातील वाघ स्थलांतरणाच्या ‘मिशन तारा’ मोहिमेअंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघिणीचे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात यशस्वीरित्या स्थलांतर पार पडले.
सध्या या वाघिणीला सोनारली येथील खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले आहे. येथील हवामानाची ती कशी जुळवून घेते याची पाहणी करुनच तिला पुढील टप्प्यात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात येणार आहे. दरम्यान, या वाघिणीचे ‘तारा’ (एसटीआर-टी़०४) असे नामकरण करण्यात आले.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व पेंच व्याघ्रप्रकल्प येथील तीन वाघ व पाच वाघीण अशा आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर करण्यास मंजूरी दिली आहे.

‘मिशन तारा’ या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘चंदा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचे यशस्वीरित्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर करण्यात आले. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे.

सुमारे तीन वर्षांची ही वाघीण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील खडसंगी वनपरिक्षेत्रातून बुधवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यात आली. कागदपत्रे, वैद्यकीय तपासण्या पूर्ण केल्यानंतर रात्री साडेदहा वाजता वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून कराडच्या दिशेने तिचा प्रवास सुरू झाला.

गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास सह्याद्रीत पोहोचली. पून्हा एकदा वैद्यकीय तपासण्या पूर्ण करुन पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास तिला खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. सुमारे एक हजार किलोमीटरचे अंतर आणि २७ तासांचा प्रवास करुन वाघीण चांदोली येथे दाखल झाली. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रअधिवास निर्माण करण्यासाठी वनविभाग सातत्यपूर्ण निरीक्षण, अधिवास सुधारणा व वैज्ञानिक पद्धतीच्या अंमलबजावणी करत आहे.


हे स्थलांतरण मैलाचा दगड..
सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्स्थापनेसाठी हे स्थलांतरण एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या चमुने यासाठी केलेली यशस्वी कामगिरी अभिनंदनास पात्र आहे.

एम.एस. रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव).


सह्याद्रीसाठी ऐतिहासिक टप्पा..
‘मिशन तारा’ हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक टप्पा आहे. या वाघिणीला खुल्या पिंजऱ्यात सोडल्यानंतर सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आमच्या चमुने ही कामगिरी जबाबदारीने पार पाडली

. – तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्रप्रकल्प.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button