*राज्यातील प्राध्यापक भरतीकडे मुख्यमंत्र्यानी जातीने लक्ष घालावे – प्रा. जोतीराम सोरटे*

*राज्यातील प्राध्यापक भरतीकडे मुख्यमंत्र्यानी जातीने लक्ष घालावे – प्रा. जोतीराम सोरटे*
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर
अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक भरतीच्या जाचक अटी, तसेच संलग्नित महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती संदर्भातील शासन निर्णय (G.R.) विलंबामुळे NET-SET आणि Ph.D. धारक सीएचबी प्राध्यापकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
राज्यातील उच्चशिक्षण व्यवस्थेत गेल्या काही महिन्यांपासून प्राध्यापक भरती प्रक्रियेतील अनिश्चितता तीव्र झाली असून, यामुळे पात्र उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी घालण्यात आलेल्या अतिजाचक अटी, अनुभवाच्या निकषांतील अस्पष्टता आणि पात्रता तपासणीच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे हजारो उमेदवार मागे राहात आहेत.
याशिवाय, राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्नित असलेल्या शासन अनुदानित अकृषक महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक शासन निर्णय (जीआर) अद्याप प्रसिद्ध न झाल्याने महाविद्यालयांतील भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे. परिणामी NET-SET उत्तीर्ण तसेच Ph.D. धारक सीएचबी (CHB) प्राध्यापकांना आर्थिक व मानसिक अशा दुहेरी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सीएचबी प्राध्यापकांकडून वर्षानुवर्षे अध्यापनाची जबाबदारी निभावूनसुद्धा त्यांना नियमित सेवा, वेतनश्रेणी, नोकरीची हमी किंवा सामाजिक सुरक्षा मिळत नाही. शासनाच्या विलंबामुळे त्यांच्या रोजगाराच्या संधी पूर्णत: ठप्प झाल्या असून अनेकांकडे पुढील शैक्षणिक वर्षातही कामाची खात्री नाही.
या पार्श्वभूमीवर NET-SET, Ph.D. धारक संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. जोतीराम सोरटे यांनी राज्य सरकारचे तातडीने लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की,
> “राज्यातील तरुणांचा प्राध्यापक भरतीतून होणारा अन्याय थांबवणे अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री यांनी स्वतः हस्तक्षेप करून अकृषी विद्यापीठांच्या भरतीतील जाचक अटी तात्काळ शिथिल कराव्यात तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या प्राध्यापक भरतीसाठीचा जीआर तातडीने काढावा.”