पुस्तक परिक्षण: घुंगुरमाळा / महानंदा भोसले : महानंदाची भाषा एखाद्या अध्यात्मिक साधकाचीच : डॉ. सुभाष के. देसाई

पुस्तक परिक्षण:
घुंगुरमाळा / महानंदा भोसले
महानंदाची भाषा एखाद्या अध्यात्मिक साधकाचीच : डॉ. सुभाष के. देसाई
वेद गंगेच्या काठावरच भुदरगड तालुक्यातील एक गाव मडिलगे खुर्द .रम्य परिसर , हिरवगार शेत शिवार अशा वातावरणात एक संवेदनशील परकर पोलक्यातील अल्लड मुलगी खेळत असावी आणि मग तिने आपला आनंद शब्दबद्ध करावा असं मला महानंदा भोसलेंच घुंगुरमाळा हा कवितासंग्रह वाचताना दिसत होतं. त्यांच्या शब्दात “कवितेची वाट जाणीव आणि मोहरलेली आत्मजागृतीच्या दिशेने नेणारी आहे. या वाटेवर मत्सर, मोह ,दंभ गळून जातो. काव्यानुभूतीच्या मार्गावर समोर द्रृगोचर होणारे चित्र आतला अहंकार लोप करत पुढे सरकत जातं ,आत्मत्वाचा शोध सुकर करत जात.” ग्रामीण भागातील ही मुलगी बघता बघता संत मीराबाई आणि बहिणाबाईच्या व सुफी संताच्या वाटेवर चालत आत्म्याचा शोध घेऊ लागते हे अचंबित करणारी गोष्ट मला वाटते. तिच्यामध्ये कविता हा साधनेचा विषय आहे जिच्यात तुम्ही हरवत जात, शांततेच्या दिशेने वाटचाल करता आणि ती तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला आत्मभान पूरवत राहते .ही सारी महानंदाची भाषा एखाद्या अध्यात्मिक साधकाचीच मला वाटते
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात मी शिवाजी विद्यापीठात शिकवताना महानंदा एक निरागस संवेदनशील मुलगी आहे हे माझ्या लक्षात आले होते पण अल्पावधीत तिची ही झेप पाहून आनंद झाला .एक लक्षात येते की पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाने किंवा त्यातील नोकरीने तिची संवेदन क्षमता करपवली नाही उलट ती व्यापक झाली.
माझं बालपण भुदरगड तालुक्यातच सोनाळी या छोट्या खेड्यात गेल तेथेही वेदगंगेचा नदीकाठ आणि महानंदाच्या साऱ्या कविता वाचताना मला बालपणीचं आपलं गेलेले रानावनातल आयुष्य आठवलं.
या कवितासंग्रहातील शीर्षक तुम्ही पाहिलीत विठू आणि पाऊस ,सोड विठ्ठला वीट तुझी, संन्यस्ताचे काहूर ,राधा, आषाढ सरी ,महाराज, ध्यान पर्व ,आत्मा हरवल्याची गोष्ट, तुका ,सत्य ,सीता ,स्वयंवर, जोगिया. यावरून हा प्रवास आत्मसाक्षात्काराकडे नेणारा अध्यात्म मार्ग आहे याची खात्री पटते .
यातील काही कविता फार उंचावर नेणाऱ्या आहेत .सत्य या कवितेतले तत्त्वज्ञान हे साधं सूध नाही. आषाढ सरी, चांदणं ,दिस आलं गारठ्याचं ,सुगी या एकापेक्षा एक तुम्हाला भान हरपायला लावणाऱ्या कविता आहेत आईची आठवण महानंदाला कासावीस करून सोडते .ते वाचताना डोळ्यातून टिप गळतात .
महानंदा या वयात ही गाठलेली उंची अजूनही तुला खूप महान करणार आहे याची मला खात्री आहे.
डॉ सुभाष के देसाई
घुंगुरमाळा
महानंदा भोसले , मोहिते
माई पब्लिकेशन पुणे मूल्य दोनशे रुपये
