नोकरीसाठीच्या पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका गोपनीयता चिंतेची बाब – प्रा. जोतीराम सोरटे* :TET परीक्षा पेपर फुटी प्रकरण

नोकरीसाठीच्या पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका गोपनीयता चिंतेची बाब – प्रा. जोतीराम सोरटे*
TET परीक्षा पेपर फुटी प्रकरण
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर
आज राज्यभरात शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पार पडली. ह्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न कांही लोकांनी केला. ह्यासंदर्भात आज मुरगुड पोलिसांनी संशयित टोळीला अटक करून पुढील तपास चालू केला आहे. ह्यामध्ये अनेक लोक गुंतले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अलीकडे शासनाने TET परीक्षा सर्व शिक्षकांना अत्यावश्यक केली असल्यामुळे सेवेत असलेले शिक्षक व डी.एड., बी.एड. उमेदवार मोठ्या संख्येने आज परीक्षेस उपस्थित होते. जवळपास ५ लाख उमेदवार ह्या परीक्षेस बसले होते. त्यामुळे ह्या प्रकारामुळे सर्व उमेदवारांच्या आयुष्याशी खेळ खेळला जात आहे. ह्या अगोदर असाच प्रकार ‘ सेट’ परीक्षा संदर्भात सुद्धा झाला होता. त्याचबरोबर इतर अनेक स्टाफ सिलेक्शन पदांच्या बाबतीतल्या परीक्षा संदर्भात सुद्धा पेपरफुटी ची प्रकरणे पुढे आली होती. हे प्रकार दिवसागणिक वाढतच चालले आहेत. ह्यासाठी शासन स्तरावरुन ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.
ह्या संदर्भात बोलताना प्रा. जोतीराम सोरटे म्हणाले कि ‘ शासनाने ह्या सर्व परीक्षा प्रश्नपत्रिका संदर्भात एक स्वतंत्र परीक्षा प्रमाद कमिटी स्थापन करावी. तसेच प्रश्न पत्रिका परीक्षा केंद्रावर वितरीत करीत असताना त्याची गोपनीयता व सुरक्षा राखणेसाठी एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी. गैरप्रकार झालेस संबंधितांना जबाबदार धरावे.’