कर्करोगाशी झुंजणारा झुंजार पत्रकार किशोर आबिटकर -डॉ सुभाष के देसाई

कर्करोगाशी झुंजणारा झुंजार पत्रकार किशोर आबिटकर
डॉ सुभाष के देसाई
आज अचानक सकाळी फिरून येताना पाठीमागून स्कूटरचा हाॅर्न ऐकू आला.”दादा बसा स्कूटरवर”मी बसलो आणि किशोरने मला घरी सोडले. आम्ही पाच मिनिटे बोलत बसलो आणि त्यावेळी कळले की आज किशोर जेष्ठ नागरिक बनले आहेत.. 65 वर्षे पूर्ण झाली.
अलीकडेच त्यांच्या वडिलांचे शताब्दी वर्ष आम्ही साजरे केले. खूप आनंदाचा सोहळा होता वडील दीर्घायुष्यी असल्यामुळे किशोरना म्हटले की तुम्हीही दीर्घायुषी होणार त्यावेळी मला कळले की कर्करोगाने त्यांना आयुष्यात खूप झुंजार बनवले आहे.
कोणालाही त्यांच्या प्रचंड क्रियाशीलते कडे बघून खरे वाटणार नाही की त्यांनी अशा आजाराशी सामना केला आहे.
मी कोल्हापूर सोडून गारगोटीला राहायला आलो आणि शेजारीच किशोर राहतात त्यामुळे आमच्या गाठीभेटी होतच राहतात सांगलीला एका दैनिकाचे संपादन करण्याची जबाबदारी पार पाडताना घडलेल्या गमतीजमती, धाडसी करामती मधून मधून ते सांगतात. पण एक निश्चित किशोरने कोणालाही पत्रकारितेमध्ये ब्लॅकमेल केले असे कधी घडले नाही. पैशासाठी त्यांनी लेखणी विकली नाही. उलट सेवाभावी डॉक्टर मोमीन, डॉक्टर मा.गो माळी. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कारखानीस सर या सगळ्यांच्या वर खास अंक प्रसिद्ध करून त्यांचा गुणगौरव केला.
कौटुंबिक जीवनात त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना शिकवले उच्च शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात झालेले परिवर्तन पाहून किशोर आनंदी आणि अभिमानी असतात. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरची पत्रकार संघटना ही बांधली आणि त्यामुळे त्यांचा दूरवर संपर्क वाढला.
आज एक वेब पोर्टल ते चालवतात त्याला हजारोंनी प्रतिसाद मिळतो त्या कामाविषयी ते खुश असतात पैसा असो वा नसो आपल्या तालामध्ये वावरणारा ,निस्वार्थी आणि झुंजार लेखणी आणि झुंजार मन बाळगणारा आमचा मित्र शतायुषी होऊ दे अशी शुभेच्छा.
डॉ. सुभाष के. देसाई
विचारवंत, जेष्ठ पत्रकार