नाम फौडेशनच्या कार्यास डॉ. मुजुमदार व डॉ. कलाम याच्यामुळे बळ!- नाना पाटेकर : सिंबायोसिस हरळी येथे कृष्णाई पुरस्काराचे वितरण!

नाम फौडेशनच्या कार्यास डॉ. मुजुमदार व डॉ. कलाम याच्यामुळे बळ!- नाना पाटेकर
सिंबायोसिस हरळी येथे कृष्णाई पुरस्काराचे वितरण!
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर निःस्पृहपणे कार्य केले आहे. त्यांच्या अलौकिक कार्याला सलाम करतो. त्यांची प्रेरणा तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्या ध्येयवेड्या कार्यातून समाजाच्या उन्नतीसाठी ‘नाम’ फौडेशनच्या माध्यमातून सुरु असलेले जलस्त्रोतांच्या बळकटीकरणाच्या कार्यास अधिक बळ मिळाले आहे. असे प्रतिपादन सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
आपली वयाची पंच्याहत्तरी झाल्याने यापुढे नाम फौंडेशनचे काम नव्या पिढीकडे सोपविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
हरळी( ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस संस्थेच्या प्रशालेत कै. कृष्णाई बळवंत मुजुमदार स्मृतीनिमित्य गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांच्या कृष्णाई पुरस्कार वितरण सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शां. ब. मुजुमदार होते.
सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. राजीव येरवडेकर, सौ. संजीवनी मुजुमदार यांची प्रमुख उपस्थिती होती .
नाना पाटेकर विद्यार्थाशी संवाद साधताना म्हणाले, आपल्यासाठी आईवडील स्वतःला झोकून देत अहोराष्ट्र कष्ट उपसतात. जीवनात यश व अपयश दोन्हीही विसरता येत नाही. ते क्षणिक असते. मात्र नटसम्राटाच्या भूमिकेतून आपण जे
दुःख वाट्याला आले ते वास्तवात भोगले याकडे लक्ष वेधत नाना पाटेकर म्हणाले, सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन माणसाने जगले पाहिजे. शालेय जीवनात वात्रटपणा केल्याने गुरुजीच्याकडून अनेकवेळा मार खाल्ला म्हणूनच जीवनात यशस्वी झालो. नाटक, सिनेमाद्वारे जीवनाला कलाटणी मिळाली. नेहमीच कलासक्त जगलो. आमच्या काळात शिक्षक आदर्शवादी होते. सध्या त्याच्या उलटे चित्र दिसून येते. आज शहरातील शाळांतून जे हरवलंय ते सिंबायोसिसच्या हरळी येथील प्रशालेत दिसून येते. येथील विद्यार्थ्याच्या अंगी असलेली शिस्त व नम्रताआपल्याला भावली.विद्यार्थ्यानी शालेय जीवनात मुक्त व स्वच्छंदी शिक्षण घेतले पाहिजे. याकडेही पाटेकर यांनी लक्ष वेधले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. मुजुमदार म्हणाले, भारताची खरी समस्या कुणी ओळखली असली तर ती नाम फौंडेशनने. जलस्त्रोतांचे बळकटीकरण करून शेतीसह, शेतकऱ्यांचे हित जपण्यात नाना पाटेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. असे स्पष्ट करून या देशात राज्यकर्त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. आज देश जागतिक पातळीवर आर्थिकदृष्ट्या पाचव्या क्रमांकावर आहे. हे सारं फसव आहे. कारण ज्या देशात शिक्षणाकडे दुर्लक्ष होते त्या देशाची प्रगती गणली जाऊ शकत नाही. असे स्पष्ट विचारही डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. विद्या येरवडेकर यांनी केले. स्वागत मुख्याध्यापिका कविता कागिनकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सतीश घाळी यांनी करून दिला. राजेंद्र शेलार यांनी आभार मानले.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.