ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदमापूर : अमावस्या यात्रेत मोठी वाहतूक कोंडी ! वाहनांच्या लांबच लांब रांगा: कोंडीची समस्या सुटणार कधी ?

आदमापूर :


अमावस्या यात्रेत मोठी वाहतूक कोंडी ! वाहनांच्या लांबच लांब रांगा: कोंडीची समस्या सुटणार कधी ?

सिंहवाणी ब्युरो / आदमापूर :
श्रीक्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथे बाळूमामाच्या अमावस्या यात्रेत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. यामुळे भाविकांना त्रास झाला. वाहतुकीसाठी राधानगरी निपाणी व गारगोटी कोल्हापूर या दोन मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्याने भाविकांना ताटकळत राहावे लागले. आदमापूर येथे प्रति आमवस्येला होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीची समस्या कधी सुटणार? असा संतप्त सवाल भाविकांकडून होत आहे.

रविवारी (दि.१८) मौनी अमावस्या दिवस. प्रति अमावास्येला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व अन्य राज्यातून हजारो भाविक आदमापूर येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी येतात. पूर्वीपासून या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. ही कोंडी सोडवण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल उभा करण्यात आला. भाविकाकडून उड्डाणपूल व रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून वाहतुकीच्या कोंडीत भर घालण्याचा प्रयत्न होतो. पार्किंग व्यवस्था असताना देखील आपणास लवकर दर्शन घेऊन जायचे आहे या हेतूने भाविक रस्त्याच्या दुतर्फा व उड्डाण पूलावरच वाहने उभी करतात.

राधानगरी-निपाणी मार्गावर नवीन जो रस्ता करण्यात आला आहे. त्याच्यासाठी जी गटर दोन्ही बाजूला बांधण्यात आलेले आहे त्यावर सिमेंट काँक्रीटचे उंचवटे ठेवण्यात आले आहेत. पूर्वी असे उंचवटे नव्हते जरी वाहने उभी केली तरी ती गटाराबरोबर उभी राहत होती पण सध्या उंचवट्यामुळे गटार सोडून रस्त्यावरच वाहने उभी राहत आहेत. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

प्रत्येक अमावस्या आणि रविवारी या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी शासकीय यंत्रणेला देवस्थानने सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रशस्त पार्किंग करण्यासाठी या जागा खरेदी केल्या आहेत. त्या पार्किंगसाठी सोईसुविधेसह तयार करून देणे महत्वाचे आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे गेले दोन वर्ष बाळूमामा विश्वस्त मंडळ राज्यभर चांगले चर्चेत राहिले आहे. कार्याध्यक्ष पद मिळवण्यासाठी धडपडी चालू आहेत. निवडी होत आहे. जमिनीच्या खरेदी व्यवहारापलीकडे भाविकांसाठी योग्य असणारा विकास करण्याकडे या विश्वस्त मंडळींचे दुर्लक्ष आहे. त्यामुळेच या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यातील वाहतुकीची कोंडी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. देवस्थानने पोलीस प्रशासनाला योग्य सहकार्य करून इथून पुढे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दखल घ्यावी,अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button