शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? महाराष्ट्रातील कोणत्या भागाला धोका कोकण, गोवा, कर्नाटक, गुजरात व केरळच्या काही भागाला धोका

शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? महाराष्ट्रातील कोणत्या भागाला धोका
कोकण, गोवा, कर्नाटक, गुजरात व केरळच्या काही भागाला धोका
सिंहवाणी ब्युरो / पुणे
सध्या महाराष्ट्रात हवामानाची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. मे महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आणि आता त्यात भर म्हणून अरबी समुद्रात तयार होणाऱ्या ‘शक्ती’ या संभाव्य चक्रीवादळामुळे नव्या संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यासंदर्भात हाय अलर्ट जारी केला असून, कोकण परिसरात विशेषत: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार असून, वाऱ्याचा वेग काही भागांत ६० किमी/ताशी पर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चक्रीवादळाचे मूळ कारण काय?
या चक्रीवादळाचे मूळ कारण म्हणजे पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र, जे येत्या ३६ तासांत अधिक तीव्र होऊन ‘शक्ती’ या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या वादळाचा मार्ग उत्तरेकडे असणार असून, त्याचा थेट फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला – विशेषतः कोकण विभागाला – बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारसह स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे. नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कुठे?
या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकण, गोवा, कर्नाटक, गुजरात व केरळच्या काही भागांना बसण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्याचा परिणाम जनजीवनावर होण्याची शक्यता आहे. पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर, वीजपुरवठ्यावर आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मच्छीमार बांधवांसाठी ही परिस्थिती अधिक चिंतेची ठरली आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते चार दिवस कोणतीही मासेमारी न करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. समुद्र खवळलेला असून लाटांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे समुद्रात जाणे अतिशय धोकादायक ठरू शकते. मच्छीमारांनी व समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आधीच मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असून, आता संभाव्य वादळामुळे आणखी नुकसान होण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी विवाहसोहळे, यात्रोत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य सामाजिक उपक्रमही पावसामुळे प्रभावित झाले आहेत. शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत या असामान्य हवामानाचा परिणाम दिसून येतो आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून, रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांमध्ये मदतकार्य, स्थलांतर, आरोग्य सेवा आणि निवाऱ्याच्या सोयी यांसाठी विशेष यंत्रणा कार्यरत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत आणि खात्रीशीर माहितीवरच विश्वास ठेवावा. हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.