*सिंहवाणी आरोग्य विशेष*
*आयुर्वेद आणि मधुमेह*
*डॉ. स्नेहल विनय कुलकर्णी*

आयुर्वेद चिकित्सा पद्धती उपचार करण्याबरोबरच रोग होऊ नये यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे आयुर्वेदामध्ये आजार टाळण्यासाठी, स्वास्थ्यरक्षणासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, सदवृत्त आचार, रसायन आणि आहार विहार पाळण्यासाठी सल्ला दिला जातो.
आयुर्वेदामधे मधुमेहाचे सविस्तर वर्णन केले गेले आहे. प्रमेह या व्याधीचा मधुमेह हा एक प्रकार आहे. प्रमेहामध्ये वात, पित्त, कफ या तीनही दोषांमध्ये विकृती उत्पन्न होते. मधुमेह हा वातप्रधान प्रमेहाचा एक प्रकार आहे. मधुमेहामधे वात दोषासह पित्त, कफ, लसिका, रक्त, मांस, मेद, मज्जा, शुक्र, ओज या शारीर भाव पदार्थांमध्ये विकृती निर्माण होते. शरीरामध्ये ओशटपणा, क्लेद वाढतो. हा जास्तीचा क्लेद मुत्राद्वारे शरीराबाहेर टाकला जातो. यामुळे मूत्रप्रवृत्ती वारंवार, जास्त प्रमाणात व गढूळ होते. शरीर असार बनते. शरीरामध्ये दौर्बल्य येते. मधुमेहामुळे शरीरामध्ये विविध लक्षणे व उपद्रव निर्माण होतात.
मधुमेह (डायबिटीस मलाईटस) हा चयापचयातील विकृतीमुळे होणारा आजार असून या आजारात रुग्णाची रक्तशर्करा दीर्घ कालावधी पर्यंत वाढलेली असते. आयुर्वेदाने मधुमेहाचा समावेश अनुशंगी विकारांमध्ये अर्थात बरे होण्यास अतिशय अवघड असलेल्या विकारांमध्ये केला आहे.
पूर्वी साथीचे आजार किंवा संसर्गजन्य आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त होती. जसे की (कॉलरा, विषमज्वर, टायफॉईड.. इ.)
सध्या मात्र मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मानसिक आजार, कॅन्सर अशा असंसर्गजन्य आजारामुळे मानवी जीवन अस्थिर बनले आहे. सध्या भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्या खालोखाल हृदयरोग, कर्करोग देखील जास्त प्रमाणात आहेत आणि या असंसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आयुर्वेद व योगाशिवाय पर्याय नाही.
प्रमेह होण्याची प्रमुख कारणे
1)अतिकॅलरीयुक्त भोजन आणि बैठी जीवनशैली
2)दिवसाच्या काळात, अवेळी झोप
3)दही, पनीर, चीज, यासारख्या पचायला जड अशा दुग्धजन्य पदार्थांचे नेहमी किंवा अत्याधिक सेवन करणे.
4)मासे, मटण, चिकन, यांचे अत्याधिक प्रमाणात सेवन करणे.
5)आरामदायक सुखकारक जीवनशैली असणे
6)शरीराला कोणत्याही प्रकारचा व्यायाम न देणे
7)मनाला बुद्धीला कोणत्याही प्रकारचे मानसिक काम न देणे (अचिंता)
खालील पूर्वरूपे दिसल्यास मधुमेह होणार असल्याचे लक्षात येऊ शकते आणि मधुमेहाच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करता येतात.
1)मधुर, श्वेतवर्णी मूत्र प्रवृत्ती
2)चेहऱ्यावर चिकटपणा येणे
3)शरीर जड होणे
4) हाता पायाची आग होणे
5)अती तहान लागणे
6)आळस
7)मुखदुर्गंधी
8) दातावर किटण चढणे
9)नखांची अधिक वाढ होणे
10)वारंवार अतिप्रमाणात होणारी गढूळ स्वरूपाची मूत्र प्रवृत्ती
ही मधुमेहाची पूर्वरूपे आहेत
मधुमेहाचे उपद्रव
1)हृदयातील रक्तवाहिन्यांची विकृती व त्यामुळे होणारा हृदयविकार,
2)सूक्ष्म रक्तवाहिन्यांची विकृती, त्यामुळे दृष्टी पटल, वृक्क ( kidney )मज्जातंतूंची, चेतनातंतूंची होणारी विकृती,
3)मधुमेही रुग्णास विविध प्रकारचे संक्रमण होण्याची अधिक शक्यता असते.
मधुमेह टाळण्यासाठी पाळावयाचे नियम
1)दिनचर्या व ऋतुचर्या पाळावी, वेळेवर भोजन घ्यावे.
2)आहारामध्ये जव, मूग, जुने तांदूळ, न चाळलेले गव्हाचे पीठ, कारले, शेवगा, हिरव्या पालेभाज्या, मेथी, पडवळ, भोपळा, लसूण, हळद, ताक, त्रिफळा, कोरफड यांचा समावेश करावा. फळांमध्ये पेरू, जांभूळ ही फळे खावीत.
3)दररोज व्यायाम करावा, पायी चालणे, पोहणे असे ऊर्जा खर्च करणारे व्यायाम नियमित करावेत.
4)योग आणि ध्यानधरणेद्वारे मानसिक ताणतणाव कमी करावा. पश्चिमोत्तानासन, हलासनासारखी योगासने करावीत. अर्धवक्रासन. धनुरासन अशी आसने योग्य त्या योग प्रशिक्षकांकडून शिकून मग करावीत.
5)वजनावर नियंत्रण ठेवावे.
6)गुळवेल, आवळ्यासारख्या रसायनांचा नियमित वापर करावा.
7)रक्तातील साखरेची नियमित तपासणी करावी. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित औषधोपचार ठेवावा.
8)वयाच्या चाळीशी नंतर नियमित रक्तशर्करा तपासावी
9) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वृक्क, डोळे यांच्या तपासण्या कराव्यात
10)गरज असल्यास आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्यानुसार शरीरशुद्धी, वमनादी पंचकर्मे करावीत.
मधुमेहासाठी अपथ्य
1)भात, साखर, साखरेचे पदार्थ, मिठाई, आईस्क्रीम यासारखे दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ, जंक फूड, शीतपेये, पिझ्झा बर्गर सारखे बाहेरचे अन्नपदार्थ टाळावेत. बटाटे,रताळी द्राक्ष आंबा, केळ्यासारखी गोड फळे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत.
2)बैठी जीवनशैली टाळावी
3)दिवसा झोपणे, अतिप्रमाणात झोप घेणे टाळावे.
4)धूम्रपान, तंबाखू खाणे, मद्यपान करणे टाळावे.
5)जखम झाल्यास किंवा संक्रमण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
असे म्हटले जाते की स्वयंपाकघर हे पहिले औषधीभांडार तर आपले अन्न हे आपले पहिले औषध असते. त्यानुसार आहाराला महत्व द्यावे.मधुमेहासाठी घरगुती औषध उपचार म्हणून हळद, दालचिनी, त्रिफळा यांचा वापर करावा.
आहारावर नियंत्रण, नियमित व्यायाम, योग, ध्यानसाधना, नियमित तपासणी व आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांकडून औषध उपचार याद्वारे मधुमेह नियंत्रित ठेवून नक्कीच आनंदी जीवन जगता येते.
डॉ. स्नेहल विनय कुलकर्णी,
आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी,
उपजिल्हा रुग्णालय
गारगोटी.
Back to top button