महिला क्रिकेट: : भारताचा स्वातंत्र्य दिनी सनसनाटी विजय, कांगारुंना लोळवत मालिका जिंकली

महिला क्रिकेट:
: भारताचा स्वातंत्र्य दिनी सनसनाटी विजय, कांगारुंना लोळवत मालिका जिंकली
सिंहवाणी वेब टीम
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वूमन्स इंडिया ए टीमने धमाका करत इतिहास घडवला आहे. भारतीय संघाने स्वातंत्र्य दिनी ब्रिस्बेनमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये सनसनाटी विजय मिळवला. भारताने या सलग दुसऱ्या विजयासह मालिकाही जिंकली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत आता 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडी घेतली. त्यामुळे भारताकडे आता तिसरा आणि अंतिम सामना जिंकून कांगारुंना क्लिन स्वीप करत टी 20 मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला टी 20 मालिकेत 3-0 ने पराभूत केलं होतं.
भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात 266 धावांचं आव्हान हे 1 बॉलआधी आणि 2 विकेट्स राखून पूर्ण केलं. भारताने 49.5 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. यास्तिका भाटीया आणि कर्णधार राधा यादव या जोडीने अर्धशतकी खेळी केली. तर प्रेमा रावत हीने अखेरच्या क्षणी नाबाद 32 धावा करत भारताला विजयी केलं. त्याआधी मिन्नू मणी हीने 3 विकेट्स घेत कांगारुंना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं.
पहिल्या डावात काय झालं?
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 265 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी एलिसा हीली हीने सर्वाधिक 91 धावांचं योगदान दिलं. तर किम गार्थ हीने 41 धावा केल्या. मात्र त्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला 30 पार पोहचता आलं नाही. भारतासाठी मिन्नू मणी हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिन्नूने फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. त्याचा फायदा भारताच्या इतर गोलंदाजांना झाला. सायमा ठाकोर हीने ऑस्ट्रेलियाच्या दोघींना आऊट केलं. तर तितास साधू, राधा यादव, प्रेमा रावत आणि तनुजा कंवर या चौघींनी 1-1 विकेट मिळवली.
भारताचा थरारक विजय
भारताची विजया धावांचा पाठलाग करतान निराशाजनक सुरुवात राहिली. भारताची 6 बाद 157 अशी स्थिती झाली होती. यास्तिका भाटीया हीने सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. यास्तिकाने 66 धावा केल्या. मात्र यास्तिकाला टॉप ऑर्डरमधील एकाही फलंदाजाकडून चांगली साथ मिळाली नाही. मात्र लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी भारताला विजयी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
कर्णधार राधा यादव हीने 60 धावांची झुंजार खेळी करत भारताला संकटातून बाहेर काढलं. तनुजा कंवर हीने 50 धावा केल्या. तर प्रेमा रावतने नाबाद 32 धावा करत भारताला सलग दुसरा विजय मिळवून दिला.