१३.५ वर्षांचा मूत्रपिंड प्रत्यारोपण केलेला जलतरणपटू गारगोटीच्या ईशान आणेकरने वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये भारतासाठी घवघवीत यश मिळवले

१३.५ वर्षांचा मूत्रपिंड प्रत्यारोपण केलेला जलतरणपटू
गारगोटीच्या ईशान आणेकरने वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये भारतासाठी घवघवीत यश मिळवले
ड्रेसडन (जर्मनी) / वृत्तसेवा
१३.५ वर्षांचा ठाणे येथे राहणारा ईशान आणेकर याने वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स २०२५ मध्ये चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा फडकावला. भारतातील सर्वात लहान वयाचा अवयव प्रत्यारोपण झालेला जलतरणपटू म्हणून त्याने दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. आणेकर कुटुंबिय गारगोटी चे आहेत.
हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमधील नववीचा विद्यार्थी असलेल्या ईशानचे वयाच्या १० व्या वर्षी मूत्रपिंडाच (किडनी) प्रत्यारोपण लिलावाती हॉस्पिटल, मुंबई येथे डॉ. उमा अली यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. त्याच्या वडिलांनी अनंत आणेकर यांनी त्याला मूत्रपिंड दान केले. या कठीण प्रसंगावर मात करत ईशानने जलतरणामध्ये आपली आवड आणि जिद्द कायम ठेवली. ड्रेसडनमध्ये त्याने १०० मीटर आणि २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर ५० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य पदक मिळवले.
विशेष म्हणजे, त्याचे वडील अनंत आणेकर यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांना डार्टस आणि पेलॉक (पेटांक) या खेळांमध्ये दोन रौप्य पदके मिळवली. त्यामुळे आणेकर कुटुंबीयांच्या झोळीत एकूण पाच पदके जमा झाली आहेत.
ईशान हिरानंदानी क्लब हाऊस येथे प्रशिक्षक पंकज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याची शिस्त, चिकाटी आणि समर्पण यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचता आले.
ईशानची आई मानसी आणेकर म्हणाल्या, ‘डॉ. उमा अली मॅडम, ऑर्गन इंडिया, त्याची शाळा, प्रशिक्षक आणि सर्व शुभेच्छुकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. ईशानच्या यशामुळे हे सिद्ध होते की अवयवदानामुळे केवळ नवीन जीवनच नाही तर नवीन स्वप्नांनाही जन्म मिळतो.”
आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघटनेची मान्यता प्राप्त असलेली वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होणारी अवयवदान आणि प्रत्यारोपणातून जगणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीचा उत्सव असतो. ईशानच्या विजयामुळे केवळ भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली नाही, तर जगासमोर आशा आणि आत्मबळाचा प्रेरणादायी संदेशही गेला आहे. यंदा ड्रेसडेन, जर्मनी येथे १७ ऑगष्ट ते २४ ऑगषट दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जगभरातील ५१ देशातील जवळजवळ १६०० प्रतिस्पध्र्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतातून ४९ अवयव प्रत्यारोपण केलेले प्रतिस्पर्धी व ८ अवयव दान केलेल्या प्रतिस्पध्र्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारताला सदर स्पर्धेत १६ सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कांस्य अशी एकूण ६३ पदके मिळाली आहेत.