चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटलांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न : महिलेविरोधात गुन्हा दाखल राजकीय क्षेत्रात खळबळ

चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटलांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न :
महिलेविरोधात गुन्हा दाखल
राजकीय क्षेत्रात खळबळ
सिंहवाणी ब्युरो / ठाणे :
चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना एका महिलेने अश्लील फोटो पाठवण्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने आमदार पाटील यांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आमदार पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेने दहा लाख रुपयाची मागणी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित अनोळखी महिला गेल्या वर्षभरापासून आमदार पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. नेहमी वेगवेगळ्या क्रमांकावरून आमदार पाटील यांना फोनवरून मेसेज करण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीच्या काळात मेसेजद्वारे मैत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मैत्रीची इच्छा व्यक्त करत संवाद वाढवल्यानंतर संबंधित महिलेने आमदार पाटील यांना अश्लील फोटो पाठवले.
या संपूर्ण प्रकरणानंतर त्या महिलेने आमदार पाटील यांच्याकडे कधी एक लाख तर कधी दोन लाख तर कधी पाच लाख रुपये अशी दहा लाखांची मागणी केली. पण वारंवार हा त्रास वाढत असल्याने आमदार पाटील यांनी त्या महिलेला ब्लॉक केले.
दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्या महिलेने दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत अश्लील छायाचित्र आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. दरम्यान पैसे नाही दिले तर पोलिसात तक्रार देईन अशी धमकीच संबंधित महिलेने आमदार पाटील यांना दिली. दरम्यान हा त्रास वाढत असल्याने आमदार पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील चितळसर पोलीस ठाण्यात 8 ऑक्टोबर रोजी या महिले संदर्भात तक्रार दिली आहे.