सोनाळी गारगोटी येथे भरवस्तीत साडेतीन लाखाची घरपोडी : नागरिकात चिंतेचे वातावरण

सोनाळी गारगोटी येथे भरवस्तीत साडेतीन लाखाची घरपोडी :
नागरिकात चिंतेचे वातावरण
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गारगोटी सोनाळी येथील एका घरात रात्री घरपोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा साडेतीन लाखाचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून भुदरगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोनाळी गारगोटी येथील श्रीमती गीतांजली इंदुलकर यांच्या घरातील सर्वजण बाहेरगावी गेले असता रात्री चोरट्यानी घरात प्रवेश करून ड्रावर मध्ये कुलपात ठेवलेले सोन्या चांदीचे नेकलेस, माळ, कानातील दागिने, अंगठी असे सुमारे अडीच तीन तोळे दागिने, चांदीच्या छोट्या छोट्या वस्तू, देवघरातील साहित्य रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. या सर्वांची अंदाजे किंमत साडेतीन लाख रुपये इतकी होत असल्याचे सांगण्यात आले.

सदर इंदुलकर कुटुंब दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर त्यांना झाला प्रकार समजून आला. त्यानंतर इंदुरकर यांनी भुदरगड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन प्राथमिक तपास केला त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक येऊन पाहणी करून गेले. आलेल्या श्वानाने इंदुलकर यांच्या घराच्या खालच्या बाजूने मोरे यांच्या घरापर्यंत जाऊन तेथेच श्वान घोटमळले.
गेल्या पंधरा दिवसांपासून सोनाळी परिसरात संशयित व चोरट्यांचा वावर झाल्याच्या चर्चा होत आहेत. अनेकांनी रात्रीच्या वेळी संशयास्पद लोक फिरताना पाहिले आहेत. काही ठिकाणी चोरीचे प्रयत्नही झाले असल्याचे नागरिक सांगतात. सोनाळी येथील प्रसाद आबिटकर यांच्या नर्सरीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक संशयित दिसून आला होता. गारगोटी शहरातील व तालुक्यातील संशयित लोकांच्या वर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे नागरिकांनी ही पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
