डोनाल्ड ट्रम्प रोहित पवारांच्या मतदारसंघातील रहिवासी; : थेट आधार कार्डच आलं समोर, नेमकं प्रकरण काय❓

डोनाल्ड ट्रम्प रोहित पवारांच्या मतदारसंघातील रहिवासी; :
थेट आधार कार्डच आलं समोर, नेमकं प्रकरण काय❓
सिंहवाणी ब्युरो / कर्जत/ पुणे
एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, डोनाल्ड तात्या ट्रम्प नावाचं एक आधार कार्ड व्हायरल झालं आहे, ज्यामध्ये त्यांच्या आधार कार्डवर रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जतमधील राशिनचा पत्ता आहे.
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र आता त्यापूर्वी विरोधी पक्षांकडून मतदार यांद्यावर आक्षेप घेण्यात आला आहे, यावरून आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड दाखवलं आहे, डोनाल्ड तात्यांप्रमाणे नको त्या अनेक लोकांनी आधारकार्ड काढलं असेल, असा आरोप रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर देखील मतदार मोठ्या प्रमाणात वाढले कसे? असा सवाल देखील यावेळी रोहित पवार यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे राशिनचे मतदार, त्यांचं आधार कार्ड तयार झालं आहे, आता ते मतदार झाले आहेत. ते काही दिवसांनी मतदारसंघातून निवडणुकीला उभे देखील राहू शकतात. घराचा खोटा नंबर, मेलच फिमेल केलं, बंगला कुठलाही टाकला. कुठलंही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही. आधार कार्ड नंबर सुद्धा डूबलीकेट आहे, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. अधिकारी सुद्धा डोळे झाक पद्धतीने मतदान करून घेतात. आता तुम्ही म्हणाल डोनाल्ड ट्रम्प तात्या यांचं असंच आधार कार्ड बनवून टाकलं होतं, आम्ही फक्त कामचं केलं पाहिजे, प्रत्येक प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे, त्यापेक्षा आम्हाला डिजिटल मतदार याद्या मिळाल्या पाहिजे. विधानसभा निवडणुकीनंतर देखील मतदार मोठ्या संख्येनं वाढले आहेत. ते अशाच पद्धतीने वाढवले गेले आहेत, जसे डोनाल्ड तात्या हे ज्या पद्धतीने इथले नागरिक झाले आहेत, त्यांनी आधार काड काढलं, तसेच नको त्या अनेक लोकांनी आपलं आधार कार्ड काढलं असेल, आणि त्यांनी आपलं मतदान कार्ड देखील काढलं असेल असं आमचं स्पष्ट मत आहे, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.