कृषीवार्ताजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री दूधगंगा वेदगंगा कारखाना उसाला प्रतिटन रुपये ३६१४ ऊस दर देणार- चेअरमन के. पी. पाटील

श्री दूधगंगा वेदगंगा कारखाना उसाला प्रतिटन रुपये ३६१४ ऊस दर देणार-
चेअरमन के. पी. पाटील


सिंहवाणी ब्युरो / बिद्री
बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला प्रतिटन रुपये ३६१४ ऊस दर देण्याची घोषणा अध्यक्ष के.पी. पाटील यांनी केली. बिद्री कारखान्याच्या प्रधान कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही घोषणा केली.के.पी. पाटील म्हणाले, मागील हंगामाची रिकव्हरी धरून एफआरपीप्रमाणे ऊस दर द्यावयाचा की ज्या त्या हंगामाची रिकव्हरी धरून एफआरपी ऊस दर द्यायची याबाबत सुप्रीम कोर्टात दावा प्रलंबित असल्याने बिद्रीने चालू सन २०२५-२६ साठी पहिली उचल रुपये ३४५२ जाहीर केला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याच्या ऊस दराची उच्चांकी परंपरा कायम ठेवत येत्या हंगामात उसास प्रति टन ३६१४ रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, व्यवस्थापकीय संचालक आर .डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे यांच्यासह संचालक खाते प्रमुख उपस्थित होते
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर ऊस पट्ट्यात ऊसदरावरुन आंदोलन सुरु आहे. ऊसदरावरून सोमवारी शेतकरी संघटना आणि कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरली होती. बिद्री कारखान्याला ३,५५२ रुपये एफआरपी असताना त्यांनी ३,४५२ रुपये पहिली उचल जाहीर केली. हे नियमबाह्य असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला होता. दरम्यान, बिद्री कारखान्याने आम्हाला प्रतिटन ३,६०७ रुपये एफआरपी बसत असून आम्ही त्याहून अधिक म्हणजे ३,६१४ रुपये ऊसदर जाहीर केला असल्याचे म्हटले आहे.
याबाबत आज कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत थेट मुंबईतून कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील सहभागी झाले होते.
बिद्री साखर कारखान्याने स्थापनेपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी एक घट्ट नाते जोडले आहे. नेहमीच उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवत या वर्षीही कारखान्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
ऊसदर जाहीर करताना के. पी. पाटील यांनी मुंबईतून बोलताना सांगितले की, “बिद्रीने आजवर शेतकऱ्यांच्या विश्वासावर चाललेली प्रगती कायम ठेवली आहे. भविष्यातही बिद्री कारखाना कोणत्याही परिस्थितीत मागे राहणार नाही.”
अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ, ऊसतोड मजूर टंचाई अशा आव्हानांनंतरही बिद्रीने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत दर निश्चित केला आहे. “शेतकऱ्यांचे पाठबळ हेच बिद्रीची ताकद आहे. याच पाठबळावर बिद्रीची यशस्वी घोडदौड पुढेही सुरू राहील. आमचे उद्दिष्ट केवळ साखर उत्पादन नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हे आहे.” असे त्यांनी नमूद केले.


याआधी आठ दिवसांपूर्वी बिद्री कारखान्याने प्रतिटन ३,४५२ रुपये विनाकपात पहिली उचल जाहीर केली होती. पण हा दर एफआरपीपेक्षा कमी असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button