तालाठ्याने चार लाखाची लाच मागितली.. सातबाऱ्यावरील नोंद दुरुस्त करण्यासाठी 2 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

तालाठ्याने चार लाखाची लाच मागितली..
सातबाऱ्यावरील नोंद दुरुस्त करण्यासाठी 2 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
सिंहवाणी ब्युरो / दौंड :
खरेदी केलेल्या क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर चुकीची झाली होती. ही नोंद दुरुस्त करण्यासाठी ४ लाखांची मागणी करून तडजोडीअंती २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना देलवडीच्या (ता.दौंड) तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोरीपार्धी येथे काल रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे दौंड महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
दीपक नवनाथ आजबे (वय 39, रा.फ्लॅट नंबर 18, आनंद हेरिटेज, बोरीपार्धी, ता. दौड जि.पुणे, मूळ पत्ता- मु. पो. खापर पांघरी ता. जि. बीड, (वर्ग-3) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका पन्नास वर्षीय व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांनी सन 2012 साली मौजे देलवडी (ता. दौंड) येथे गट क्र. 1506 मधील 0.06 आर क्षेत्र खरेदी केले असून महसूल दप्तरी सातबारा उताऱ्यावर वर नोंदी झालेल्या आहेत. तक्रारदार यांनी जुलै 2024 मध्ये जमिनीचा संगणकीय सातबारा उतारा काढला. त्यावेळी त्यांना सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावे 0.06 आर ऐवजी 0.03 आर क्षेत्राची नोंद दिसून आली. तक्रारदार यांनी संगणकीय सातबारा वरती दुरुस्ती होण्यासाठी आरोपी लोकसेवक तलाठी दीपक आजबे यांच्याकडे लेखी अर्ज केला होता. तक्रारदार हे सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती होण्याकरीता तलाठी दीपक आजबे यांना वारंवार भेट घेत होते. तेव्हा तलाठी दीपक आजबे यांनी तक्रारदारांना काम करून देण्याचे आश्वासन देत होते.
दरम्यान, सप्टेंबर 2025 मध्ये तक्रारदार यांच्या संगणकीय सातबारा उताऱ्यावर दुरुस्ती करण्याकरीता तलाठी दीपक आजबे यांनी तक्रारदारांकडे हस्तलिखित सातबारा उताऱ्याची प्रत मागितली. तेव्हा तक्रारदार यांनी ती हस्तलिखित प्रत तहसीलदार कार्यालयातून प्राप्त करून तलाठी आजबे यांना दिली. त्यावेळी तलाठी दीपक आजबे यांनी तक्रारदाराच्या संगणकीय सातबारा उताऱ्यावर दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. व तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक तलाठी दीपक आजबे यांनी तक्रारदारांच्या वरील कामासाठी 3 लाखांच्या लाचेची मागणी करून 2.5 लाख स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. आणि तलाठी दीपक आजबे यांनी 2.5 लाखाची मागणी करून तडजोडीअंती 2 लाख स्वीकारण्याची तयारी दर्शविले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केडगाव चौफुला (ता. दौंड) येथे सोमवारी सापळा रचला. यावेळी आरोपी लोकसेवक तलाठी दीपक आजबे यांना तक्रारदार यांच्याकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
याप्रकरणी आरोपी लोकसेवक तलाठी दीपक आजबे याच्यावर यवत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करत आहेत.