ताज्या घडामोडीविशेषसामाजिक

तत्त्वज्ञान पाहिजे कशाला ? तत्त्वज्ञान म्हणजे नेमके काय तत्वज्ञान ही विचार करण्याची एक रीत आहे..: डाॅ. सुभाष के देसाई

सिंहवाणी विशेष..
आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान दिनानिमित्त आम्ही डॉक्टर सुभाष देसाई यांचा हा विशेष लेख प्रसिद्ध करीत आहोत. डॉक्टर देसाई यांनी तत्त्वज्ञानामध्ये डॉक्टरेट पदवी संपादित केली आहे.


तत्त्वज्ञान पाहिजे कशाला ? तत्त्वज्ञान म्हणजे नेमके काय?
तत्वज्ञान ही विचार करण्याची एक रीत आहे

डाॅ. सुभाष के देसाई
Ph.D.(philosophy)

तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वासंबंधीचे ज्ञान म्हणजे ते जे काही आहे ते सर्व. एकूण एक .जसे मनुष्याचा मनुष्यपणा म्हणजे मनुष्यत्व किंवा पशुचा पशुपणा म्हणजे पशुत्व तसेच सार म्हणजे तत्व .जे गुण अस्तित्व आहे त्याचे सार काय ?त्याचा अर्थ काय? त्याचे वास्तव रूप काय? त्याचे तात्पर्य काय अशातऱ्हेचा प्रश्न हा तत्वज्ञानाचा प्रश्न तत्त्वज्ञानाचे खरे कार्य विश्लेषणाचे असते .
आपण अनेक संकल्पना वापरतो त्यांना अर्थाचे पुष्कळ पदर असतात पण जो संकल्पनेचा वापर करतो त्याच्यापुढे ते पदर विभक्त होऊन उभे नसतात त्यामुळे अनेक वेळेला वैचारिक घोटाळे होतात. आपण अनेक वेळेला संकल्पना वापरतो त्याचा अर्थ आपल्याला माहिती असत नाही. त्याचे आकलन आपल्याला झालेले नसते. तो अर्थ विश्लेषण करून बाहेर काढणे हे तत्त्वचिंतकाचे काम असते. सॉक्रेटिस ने फार पूर्वीच म्हणून ठेवले आहे की त्याचे काम सुईनीच्या कामासारखे होते .सुईन मूल निर्माण करीत नाही ते आईच्या उदरात असते त्यास बाहेर येण्यास सुईन मदत करते .तत्व चिंतक सॉक्रेटिस हा सर्वांच्या मनात आधीपासून असलेले सत्य आपल्या विश्लेषणाच्या पद्धतीने बाहेर काढत होता सारांश असा की तत्व चिंतन म्हणजे संकल्पनांचे विश्लेषण .philosophy is conceptual analysis
तत्वचिंतकाने केवळ विश्लेषण करीत बसावे ही गोष्ट काही विचारवंतांना मानवत नाही ते म्हणतात की अनेक फिलॉसॉफर एखाद्या गोष्टीचा अकारण काथ्याकुट करत बसतात त्यांचा दृष्टिकोनच पकडता येत नाही.
तत्वज्ञानाची विशेषता त्याच्या अभ्यास विषयात नसून त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत असते. तत्त्वज्ञानात गृहीत असे काहीच नसते .कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करत जायचे जोपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचे या सर्व बौद्धिक व्यापाराचे नाव तत्व चिंतन किंवा तत्वज्ञान तत्वज्ञान ही विचार करण्याची एक रीत आहे ती कृती आहे तत्त्वज्ञान म्हणजे सिद्धांत संग्रह नव्हे

तत्त्वज्ञान पाहिजे कशाला ?त्या विना काय अडले आहे? त्याचा उपयोग काय ?असे प्रश्न काही जण उपस्थित करतात त्याचे उत्तर असे की तत्त्वज्ञान आपणास टाळताच येणार नाही आपण जगत असतो आणि जगताना कोणता तरी जीवन विषयदृष्टिकोन स्वीकारत असतो आपण आशावादी असतो निराशावादी असतो किंवा सर्व तुच्छतावादी असतो या आपल्या वृत्ती जीवनाची अथवा सत्त्याची जे दर्शन आपण प्रमाण मानतो त्यावर आधारित असतात वास्तवाचे स्वरूप असे असेल असे आपण विचारपूर्वक ठरवतो असे नाही परंपरेने आणि परिस्थितीमुळेही काही मते आणि वृत्ती निर्धारित होतात पण विश्वस्वरूपाविषयी आपली मते विचारपूर्वक बनवणे म्हणजेच तंत्वचिंतन करणे आणि वृत्तीना विचारपूर्वक वळण देणे.असे करण्याने आपण खरेखुरे अस्सल शाश्वत जीवन जगू शकतो
तत्त्वज्ञानाशी परिचय असेल तर माणसाच्या विचारांचे सर्वच संदर्भ व्यापक होतात स्वतःच्या दुःखाकडे तो विश्वाच्या संदर्भात पाहतो त्यामुळे दुःखाचे आघात सहन करण्याची त्याची क्षमता इतराहून सामान्यतः अधिक असते विनाकारण आयुष्यातील एखाद्या अनुभवामुळे माणूस बेजार होऊन जातो सुखाच्या झुळकेने उरळून जातो आणि दुःखाच्या तिरीपेने उद्विग्न होतो दैनंदिन किरकोळ गोष्टीचे मनावर दडपण पडलेले असते तत्त्वज्ञानाच्या परिशिलनाने ते हलके होते. चिरंतनाच्या चिंतनाने, अखंडाच्या अभ्यासाने वृत्ती उदार होतात आणि जीवन गंभीर बनते. शाश्वताची शलाका या रीतीने पुढे असलेल्या वास्तवाचे दर्शन घ्यावयास शिकते तर जीवनातील क्षोभ कमी होतो हे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचे सर्वात मोठे फल आहे
तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेल्या व्यक्तीच्या विचारात आपोआप एक शिस्त येते ही शिस्त इतर कोणत्याही विषयाच्या अभ्यासास उपयोगी पडते.
बुद्ध महावीर बसवेश्वर हे केवळ धार्मिक लोक नव्हते तर तत्वज्ञ होते, सॉक्रेटिस ते रसेल, मार्क्स , विवेकानंद या सगळ्यांना आम्ही तत्वज्ञ म्हणतो त्यांनी मांडलेले विचार खऱ्या अर्थाने शाश्वत असतात त्यांचा हर घडी जीवनात उपयोग होतो हे आपल्याला विसरता येत नाही .

डॉ सुभाष के देसाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button