देशात सर्वोत्तम कोल्हापूरचा ‘रॉयल रायडर्स क्लब’; यंदाच्या मोटोवर्स 2025 ‘चॅम्पियन क्लब’चा मान

देशात सर्वोत्तम कोल्हापूरचा ‘रॉयल रायडर्स क्लब’;
यंदाच्या मोटोवर्स 2025 ‘चॅम्पियन क्लब’चा मान
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
कोल्हापूर म्हणजे रांगड्या लोकांचं शहर. इथं कित्येक जण फक्त आवड आणि रुबाब म्हणून बुलेट चालवतात. कोल्हापुरातल्या बुलेट प्रेमींची संख्या तर न मोजण्याइतकी आहे. त्यामुळं कोल्हापुरात अनेक ‘बाईक रायडर्स क्लब’ कार्यरत आहेत. यापैकी एका क्लबनं बाईक रायडिंग क्षेत्रात कोल्हापूरचा बहुमान राज्यासह देशभरात गाजवला आहे. दुचाकी विश्वातील प्रतिष्ठेचा गोव्यात पार पडलेला ‘मोटोवर्स 2025’ मेळावा यंदा कोल्हापूरच्या ‘रॉयल रायडर्स क्लब’नं गाजवला. देशात सर्वोत्कृष्ट म्हणून या क्लबला ‘चॅम्पियन क्लब’चा मान मिळाला असून, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. रॉयल रायडर्सनं एकूण 21 ट्रॉफीज आणि 5 होलशॉट पदकं पटकावत देशातील हजारो रायडर्समध्ये बाजी मारली.
काय आहे रॉयल रायडर्स क्लब? : “2008 साली स्थापन झालेला कोल्हापूरचा रॉयल रायडर्स क्लब हा पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बाईक रायडिंग क्लब आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील सदस्य या क्लबमध्ये आहेत. 18 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंतचे रायडर्स यात सक्रिय आहेत. क्लबच्या माध्यमातून ते वर्षभर विविध सामाजिक मोहिमा, रस्ते सुरक्षा अभियान आणि स्वच्छता उपक्रम राबवतात. देशभरात आयोजित रायडिंग मोहिमांमधून हा क्लब सुरक्षित वाहतूक आणि जबाबदार प्रवासाचा संदेश देत असतो. तसंच देशभरातील स्पर्धांमधून आजवर मोठा नावलौकिक क्लबनं मिळवला आहे,” असं क्लबचे सदस्य आणि संचालक जयदीप पवार यांनी सांगितलं.
15 हजार रायडर्समधून मिळवला ‘चॅम्पियन क्लब’चा सन्मान : दरवर्षी ‘रॉयल एन्फिल्ड’ कंपनीतर्फे वागातोर इथं ‘मोटोवर्स’ या नावानं बुलेट रायडर्सचा भव्य मेळावा आयोजित केला जातो. यावर्षी देशभरातून तब्बल 15 हजार रायडर्स सहभागी झाले होते. डर्ट ट्रॅक, एन्ड्युरन्स, हिल क्लाइंब अशा अनेक स्पर्धांमध्ये रॉयल रायडर्सनं आपल्या दमदार कामगिरीवर मोहोर उमटवली. वजनदार आणि नियंत्रणास अवघड असलेल्या बुलेटवर जबरदस्त पकड दाखवत रॉयल रायडर्सच्या रायडर्सनी प्रतिस्पर्ध्यांना मागं टाकलं. रॉयल एन्फिल्ड-आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांच्या हस्ते रॉयल रायडर्स क्लबचे संचालक जयदीप पवार यांना ‘चॅम्पियन क्लब’चा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे रॉयल रायडर्स आणि द्वितीय क्रमांकाच्या क्लबमध्ये तब्बल 460 गुणांचा मोठा फरक होता.
यशामागं अनेकांचे कष्ट… : या ऐतिहासिक यशामागे जयदीप पवार, अभिजित काशिद आणि अध्यक्ष संतोष शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. टीम व्यवस्थापनाची जबाबदारी सचिन घोरपडे, ओंकार बुधाले आणि श्रीनिकेतन कुलकर्णी यांनी सांभाळली. कोल्हापूरच्या मोहिते रेसिंग अकॅडमीचे संचालक अभिषेक मोहिते आणि ध्रुव मोहिते तसंच मोटर इंडिया बुलेट शोरूमचे रत्नाकर बांदिवडेकर यांनीही टीमला सहकार्य दिलंय. टीममधील समीर मिस्त्री, श्रीजय अथणे, प्रमोद चौगुले, हर्ष तेजम, प्रतीक सूर्यवंशी, किरण प्रसाद आणि सोहम माळी यांनी प्रभावी कामगिरी दाखवली.
या यशात विशेष भावनात्मक क्षण होता तो म्हणजे टीमचे आधारस्तंभ असलेले बुलेट मेकॅनिक अमोल माळी यांच्या स्मृतींना अभिवादन. फेब्रुवारी महिन्यात निधन झालेल्या क्लबचे बुलेट मेकॅनिक अमोल माळी यांना विजेत्या सर्व सदस्यांनी आपली पारितोषिकं अर्पण केलीत. टीमच्या सर्व गाड्या त्यांच्या ‘अलंकार गॅरेज’मध्येच तयार केल्या होत्या.