बाळूमामा देवस्थानचे इतिवृत्त ठार मारण्याची धमकी देऊन बदलले – तक्रार दाखल

बाळूमामा देवस्थानचे इतिवृत्त ठार मारण्याची धमकी देऊन बदलले – तक्रार दाखल
सिंहवाणी ब्युरो /गारगोटी :
आदमापूर येथील बाळूमामा देवालय न्यासाचे इतिवृत्त ठार मारण्याची धमकी देत बेकायदेशीररीत्या बदलायला लावल्याची तक्रार मंदिराचे लेखनिक अरविंद गणेश स्मार्त यांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्जातून बुधवारी केली. या तक्रारीच्या प्रती त्यांनी गृहमंत्री, पालकमंत्री, धर्मादाय आयुक्त – मुंबई, धर्मादाय सहआयुक्त – कोल्हापूर, बाळूमामा देवालय अध्यक्ष, विश्वस्त यांना दिल्या आहेत. तक्रारीत आदमापूर येथील बाळूमामा मंदिर येथे मी लेखनिक आहे. सोमवार (दि. २७) सुट्टी असताना दुपारी दोनच्या सुमारास विश्वस्त सरपंच विजय गुरव यांनी मला फोन करून मीटिंगची नोटीस पोस्टामधून टाकायची आहे, असे सांगून गारगोटी बसस्थानकावर येण्यास सांगितले. त्यावेळी बाळूमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांच्या गाडीतून सरपंच गुरव आले. त्यांनी मला चहा पिण्याचे निमित्त करून गाडीत बसवून कडगाव रस्त्यावर नेले. त्यानंतर मित्राने जेवण केले आहे, असे सांगून फये येथील रिसॉर्टवर नेले.
त्यानंतर तेथे आनंदा पाटील, विनायक पाटील, नामदेव पाटील, मारुती पाटील हे सर्व आले. मला विजय गुरव यांनी इतिवृत्त बदलण्यास सांगितले. त्यावेळी हे बेकायदेशीर असून, मला तसे करता येणार नाही, असे मी त्यांना सांगितले; पण त्यांनी मला ठार मारण्याची धमकी देत ‘आर्थिक व्यवहारांची जबाबदारी तुझ्यावर टाकीन,’ असे धमकावत इतिवृत्तामधील एक पान काढून माझ्यासमोर पान क्रमांक बदलले आणि इतिवृत्त बदलण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी मला आकुर्डे-गारगोटीदरम्यान रस्त्यावर सोडले.
तक्रारीच्या प्रती त्यांनी गृहमंत्री, पालकमंत्री , धर्मादाय आयुक्त -मुंबई, धर्मादाय सहआयुक्त आदींना दिल्या आहेत.
अरविंद स्मार्त हे ११ महिन्यांसाठी देवस्थानकडे कंत्राटी कामगार होते. या काळात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याची त्यांच्याकडे विचारणा केली असता, या रागातून त्यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा खुलासा पुराव्यानिशी आम्ही लवकर जाहीर करू.
विजय गुरव, सरपंच व पदसिद्ध विश्वस्त, बाळूमामा देवस्थान, आदमापूर