*शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारी प्रवृत्तीला वेळीच गाडा, अन्यथा काळ सोकावतो* : *TET व SET पेपर फुटी प्रकरणावर प्रा. सोरटे आक्रमक*

*शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारी प्रवृत्तीला वेळीच गाडा, अन्यथा काळ सोकावतो*
TET व SET पेपर फुटी प्रकरणावर प्रा. सोरटे आक्रमक
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आणि राज्य पात्रता परीक्षा (SET) पेपरफुटी प्रकरणाने शिक्षण क्षेत्राची प्रतिष्ठाच धोक्यात आली असून, या प्रकरणाचा मूळस्वरूपात तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका प्रा. जोतीराम सोरटे यांनी मांडली आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्ट प्रवृत्तीवर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराला वेळीच गाडलं नाही, तर काळ शिक्षणव्यवस्थेलाच सोकावून टाकेल. मागील चार-पाच वर्षापासून चालू असलेल्या या गैरप्रकाराला वेळीच आळा घातला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती”
अलीकडेच कोल्हापूर पोलिसांनी TET पेपरफुटीचा प्रयत्न हाणून पाडत संशयितांना अटक केली. चौकशीत TET बरोबरच SET परीक्षा पेपरफुटीमध्येही काही रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत मिळाले. या धक्कादायक घटनांमुळे पात्र, अभ्यासू आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा गंभीर आरोप प्रा. सोरटे यांनी केला.
प्रा. सोरटे म्हणाले, “नेट, सेट, पीएच.डी. धारक अनेक युवक-युवती दीर्घकाळ नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचवेळी पेपरफुटी सारख्या घटनांमुळे अयोग्य लोक परस्पर लाभ घेऊन शिक्षण क्षेत्रात घुसखोरी करत आहेत. हा प्रकार म्हणजे पात्रतेचा, मेहनतीचा आणि गुणवत्तेचा उघड अपमान आहे.”
पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाई मुळे संशयित गुन्हेगार व रॅकेट उघडकीस आले असून त्यांनी जबाबात TET व SET चे पेपर फोडल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती फार मोठी असून त्याची पाळेमुळे राज्याच्या बाहेर सुद्धा आहेत. तेव्हा हा तपास अधिक तीव्र करून त्याची पाळेमुळे शोधून काढण्याचे आवाहन आता पोलिसांच्या समोर आहे. मात्र, हे रॅकेट केवळ बोडाच्या आतपुरते नसून त्यामागे मोठे जाळे असू शकते, म्हणून तपास अधिक व्यापक करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पेपरफुटी प्रकरणातील सर्व संबंधित – बेकायदेशीर लाभार्थी, दलाल, तसेच भ्रष्ट प्रवृत्ती यांची सखोल चौकशी करून कठोर शिक्षा व्हावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्राविषयी जनतेचा विश्वास ढळतो असून, भविष्यातील शिक्षक आणि प्राध्यापक घडवणाऱ्या प्रक्रियेलाच धक्का बसतो, असेही ते म्हणाले. “शिक्षण ही पवित्र सेवा आहे. त्याला कलंक लावणाऱ्या सर्व प्रवृत्तींचा नायनाट करणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता, तंत्रज्ञान आधारित सुरक्षा आणि कठोर नियंत्रण प्रणाली लागू करण्याची मागणी त्यांनी केली. “आज भ्रष्टाचाराला न जुमानणारी पिढी घडवायची असेल, तर शिक्षण क्षेत्र शुद्ध आणि सुरक्षित करणे अत्यावश्यक आहे,” असा संदेश प्रा. सोरटे यांनी दिला.