अनेक शिक्षकांचे भविष्य धोक्यात! २६ जणांवर गुन्हे : पेपरसाठी २०० टोळीला जणांनी दिले होते पैसे

अनेक शिक्षकांचे भविष्य धोक्यात! २६ जणांवर गुन्हे :
पेपरसाठी २०० टोळीला जणांनी दिले होते पैसे;
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या २६ पर्यंत गेली आहे. पेपर मिळविण्यासाठी सुमारे दोनशे शिक्षकांनी या टोळीकडे पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. या शिक्षकांची यादी पोलिसांच्या हाती लागली असून, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यातून आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता आहे
पेपरफुटीच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिहारचे आहेत. त्यांना पडकण्यासाठी पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाले आहे. शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात २६ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; तर १९ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काही शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्यांचा समावेश आहे. प्राध्यापक व प्राचार्य यांना संबंधित संस्थांनी निलंबित केले आहे. मुख्य संशयित महेश गायकवाड बिहारमधून पेपर आणणार होता. मुख्य सूत्रधार रितेशकुमार बिहारचा आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या अन्य पाच जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना पडकण्यासाठी पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले आहे.
यंदाच्या टीईटी परीक्षेदरम्यान मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या इंग्रजी माध्यमाच्या सर्व उमेदवारांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रभारी शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांची भेट घेत या उमेदवारांनी आपली बाजू मांडली.
रविवारी (२३ नोव्हेंबर) घेण्यात आलेल्या ‘टीईटी’ परीक्षेमध्ये नाशिक येथील सीडीओ मेरी हायस्कूल या केंद्रावर अत्यंत गंभीर प्रकार समोर आला. इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. केंद्रप्रमुखांच्या निदर्शनास ही बाब येऊनही केवळ वेळकाढूपणा केला. तसेच यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. थोडा वेळ थांबा, असे सांगत परीक्षा संपायला अर्धा तास उरेपर्यंत उमेदवारांना केवळ आश्वासन देण्यात आले होतो. अखेर उमेदवारांनी मिळालेली प्रश्नपत्रिका उरलेल्या अर्धा-पाऊण तासात सोडवली. त्यामुळे उमेदवारांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणाची लवकर दखल घ्या अशी मागणी करण्यात आली आहे.