गडहिंग्लजला ७४ टक्के मतदान;उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद; : निकालासाठी वाट पहावी लागणार

गडहिंग्लजला ७४ टक्के मतदान;उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद;
निकालासाठी वाट पहावी लागणार
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
गडहिंग्लज नगरपालिकेच्या ३५ मतदान केंद्रावर २१ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी जोरदार ईर्ष्येने मतदान झाले. एकूण ३०१६१ मतदारपैकी २२१८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ७३.५६ टक्के मतदान झाले.
नगरसेवक पदासाठी ५१ उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी६ उमेदवार रिंगणात होते. अंत्यत चुरशीने व अटीतटीच्या लढतीत किरकोळ वादावादी वगळता शांततेने मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. गडहिंग्लज नगरपालिकेच्या प्रभाग 3 अ ची निवडणूक प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आल्याने तेथे फक्त एका गटाच्या म्हणजे ३ ब आणि नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांनी मतदान केले.
शिवराज कॉलेज येथील मतदान केंद्रावर प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बोगस मतदानाचा प्रकार रोखण्यात आला. बॅ नाथ पै प्रशालेच्या मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात उमेदवारा त किरकोळ वादावादी झाली.
गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जनता दलाच्या नेत्या प्रा स्वाती शिंदे कोरी यांच्या नेतृत्वाखाली जनता दल जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजपा शिंदेशाही शिवसेना रिंगणात होती. राजकीय ईष्येतून दोन्ही आघाड्यांनी प्रचार सभा रॅली तसेच वैयक्तिक भेटी गाठी हारे रान उठविले होते. मंत्री मुश्रीफ यांच्या सह पालकमंत्री आबिटकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील आम विनय कोरे यांनी नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली .दुपारच्या सत्रात मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी गडहिंग्लज शहरातील विविध मतदान केंद्रावर भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
एक- एक मतासाठी कार्यकर्त्याची धडपड सुरू होती. ज्येष्ठांना रिक्षा तसेच वाहनातून मतदान स्थळी कार्यकर्त्यांनी आणले. सकाळच्या सत्रात थंडी असल्याने मतदानाचा वेग कमी होता. ११ वाजल्यानंतर मतदानाचा वेग वाढला. सायंकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांना आणण्यासाठी दोन्ही आघाडीच्या कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेत शेळके, सहाय्यक अधिकारी देवानंद ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. २९० कर्मचारी पालिका निवडणूकीसाठी कार्यरत होते. पोलिस उप अधीक्षक रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
*प्रभागनिहाय टक्केवारी अशी*
प्रभाग १- ७३.३९/
प्रभाग २- ७२.८४/
प्रभाग ३- ७५.३४/
प्रभाग ४- ७६.७४/
प्रभाग ५- ७०.४२/
प्रभाग ६- ७३.६१/
प्रभाग ७- ६९.६८/
प्रभाग ८- ७९.२/
प्रभाग ९- ७९.३७/
प्रभाग १०-७३.७९/
प्रभाग११- ६६.८८/

