कर्नाटक विधानसौध हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर बेळगावात मराठी फलक कन्नडिगांनी फाडले

कर्नाटक विधानसौध हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर बेळगावात मराठी फलक कन्नडिगांनी फाडले
सिंहवाणी ब्युरो / बेळगांव :
बेळगाव, येथील चन्नम्मा चौकात मराठी आणि कन्नड भाषेतून लावण्यात आलेले शुभेच्छा फलक कन्नडिगांनी फाडले. यावेळी पोलिस या ठिकाणी उपस्थित होते; मात्र त्यांनीही बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिसदेखील कन्नड संघटनांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.
आठ डिसेंबरपासून सुवर्ण विधानसौध बेळगाव येथे कर्नाटक सरकार राज्य विधिमंडळाच्या हिवाळीअधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या मंत्री, आमदार व राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी चन्नम्मा चौकासह शहराच्या विविध भागांत फलक लावण्यात आले आहेत. तसेच काही फलकांवर कन्नड व मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे. शुभेच्छा फलकांवर मराठी भाषेचा वापर करण्यात आल्याने पोटशूळ उठलेल्याकन्नडिगांनी चन्नम्मा चौक परिसरातील काही फलक फाडले. यावेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पोलिसांनी करणे आवश्यक होते. मात्र फलक फाडत असताना पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण झाला. कन्नडिगानी शहराची शांतता भंग करण्याचा प्रकार केला असतानादेखील पोलिस कारवाई करीत नाहीत. याबाबत जोरदार चर्चा आहे.सरकारी नियमावलीनुसार ६० टक्के कन्नड व ४० टक्के मराठी भाषेचा उल्लेख असलेला बॅनर देखील फाडण्याचे प्रकार घडले. कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या स्वागतासाठी लावलेले फलक फाडण्यात आल्याने कानडी संघटनांचा मराठी द्वेष पुन्हा एकदा दिसून आला.
राणी चन्नम्मा चौक येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके व भाजप नेते मुरगेंद्रगौडा पाटील यांनी विरोधी पक्षाच्या स्वागताचे फलक लावले होते. कन्नडसोबत मराठी भाषेतही फलकावर उल्लेख करण्यात आला होता. परंतु, नेहमीच मराठीची काविळ असलेल्या काही कानडी संघटनांकडूनस्टंटबाजी करत मराठीत असलेले फलक फाडण्यात आले.