साताऱ्यात स्टेट बॅंकचे एटीएम फोडले : चोरटयांचा सातशे कि. मी. थरारक पाठलाग : आंतरराज्य टोळी जेरबंद, मध्य प्रदेशात कारवाई

साताऱ्यात स्टेट बॅंकचे एटीएम फोडले : चोरटयांचा सातशे कि. मी. थरारक पाठलाग :
आंतरराज्य टोळी जेरबंद, मध्य प्रदेशात कारवाई
सिंहवाणी ब्युरो / सातारा :
साताऱ्यातील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून १२ लाख रुपये लंपास करणाऱ्या हरियाणातील दरोडेखोरांच्या आंतरराज्य टोळीला मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात जेरबंद करण्यात यश आलं आहे. त्यांच्याकडून ११ लाख ९९ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार जप्त करून त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पोलिसांकडून संशयितांचा ७०० किलोमीटर पाठलाग : हासमदिन अल्लाबचाए खान (रा. मलार, ता. फलोदी, जि. जोधपूर, राजस्थान), सलीम मुल्ली इस्ताक (रा. दौरखी, ता. फिरोजपूर, जि. नहुमेवात, हरियाणा) आणि राहूल रफिक (रा. बाजीदपूर, ता. फिरोजपूर, जि. नहुमेवात, हरियाणा), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ७०० कि. मी. पाठलाग करून ही कारवाई केली. शिवथर (ता. सातारा) गावातील स्टेट बँकेच्या एटीएमवर शनिवारी (६ डिसेंबर) मध्यरात्री हा दरोडा पडला होता. घटना गंभीर असल्यानं पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ३ वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजमुळं दरोडेखोर सापडला : गुन्ह्यात वापरलेल्या संशयास्पद क्रेटा कारसह संशयितांचे फुटेज देखील पोलिसांना मिळाले. त्याआधारे माहिती प्राप्त केली असता हरियाणातील टोळीने गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संशयितांची ओळख पटवली असता ते मेवात (हरियाणा) येथील असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, गुन्हा केल्यानंतर आरोपी पुणे औरंगाबाद, धुळे, धार, इंदूर (मध्य प्रदेश), दिल्ली मार्गे मेवातकडे (हरियाणा) जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला.
महाराष्ट्रातून निसटले अन् मध्य प्रदेशात सापडले : आरोपींची गाडी आणि पोलीस पथकामध्ये जवळपास २०० ते २५० कि. मी. अंतराचा फरक राहात होता. आरोपींची गाडी रविवारी (७ डिसेंबर) सकाळी १० वाजता धुळे जिल्ह्याची हद्द पार करुन मध्यप्रदेश राज्यात गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्वतः धार आणि इंदूरच्या एसपींशी संपर्क करुन त्यांना संशयिताचे आणि वाहनाचे सीसीटीव्ही फुटेज पाठवून नाकाबंदीची विनंती केली. त्यानुसार तेथील पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत संशयीत आरोपी पिथमपूर पोलीस ठाणे (जि. धार, मध्य प्रदेश) हद्दीतून दिल्लीकडं जात असताना त्यांना ताब्यात घेतलं.
पाच राज्यात एटीएम फोडीचे गुन्हे : सातारा एलसीबीचे पथक सात तासात ७०० कि. मी. अंतर कापून पिथमपूर पोलीस स्टेशनला पोहोचले. संशयितांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. एटीएममधून चोरलेल्या १२ लाख ६ हजार रुपयांपैकी ११ लाख ९९ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार तसंच आरोपींनी एटीएम फोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले. अटक करण्यात आलेले आरोपी हे एटीएम फोडणारे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गुजरात, आसाम, राजस्थान, कर्नाटक या राज्यात एटीएम चोरीचे गुन्हे दाखल आहेत.