आयुष्यात यशाची नवी उंची गाठण्यासाठी शाळा स्तरावरील स्पर्धा महत्त्वाच्या : शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत

आयुष्यात यशाची नवी उंची गाठण्यासाठी शाळा स्तरावरील स्पर्धा महत्त्वाच्या :
– शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्यातील क्रीडा व कलागुणांना वाव देण्यासाठी गारगोटी हायस्कूलने केलेला प्रयत्न गौरवास्पद असून आयुष्यात यशाची नवी उंची गाठण्यासाठी शाळा स्तरावरील स्पर्धा महत्त्वाच्या आहेत, असे उदगार शिक्षणाधिकारी (माध्य.) सौ.सुवर्णा सावंत काढले.
गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या ३५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षणाधिकारी (माध्य.) सौ.सुवर्णा सावंत बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी श्री प्रबोध कांबळे होते. यावेळी ग्रामीण कथाकार, पत्रकार संजय खोचारे यांचे कथाकथन झाले.
यावेळी विविध स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा व माता पालकांचा सत्कार शिक्षणाधिकारी सौ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धा उद्घाटन सरोजनी कॉलनीचे अध्यक्ष एन.जे.चव्हाण यांच्या हस्ते व उद्योजक अमेय रायजादे यांच्या उपस्थितीत झाले. शैक्षणिक साधने रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई यांच्या हस्ते व प्रशांत भोई, राहुल जाधव, सुभाष महादेव कदम यांच्या उपस्थितीत झाले. फनी गेम्सचे उद्घाटन प्राचार्या सौ. मंजुषा माळी यांच्या हस्ते व माजी सरपंच सौ. रुपाली राऊत, पोलीस पाटील रोहिणी निढोरे, दिलशाद काझी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यानिमित्ताने आयोजित हळदी कुंकू समारंभास ७०० महिलांनी उपस्थिती नोंदवली. माता पालकांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा संपन्न झाली.
यावेळी गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, उपसरपंच राहुल चौगुले, संस्थेचे संचालक आनंदराव जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रशांत तोंदले, शिंदेवाडीचे सरपंच रमेश थोरबोले, हणबरवाडीच्या सरपंच सौ.सुनीता खोत, के. ए. देसाई, मुख्याध्यापक बी.डी.कांबळे, अमर देसाई, सागर पाटील, आर. वाय. देसाई, सौ.भारती शिंदे, उद्योजक रणजित पोवार, बालसाहित्यिक बा.स.जठार, माजी विद्यार्थी संघाचे विलास डवर, प्रकाश कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम गुरव, विद्यार्थिनी प्रतिनिधी संचिता चव्हाण यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या हस्ते, श्री.मौनी विद्यापीठाचे माजी सदस्य अल्केश कांदळकर, माजी उपसरपंच सचिनबाबा देसाई, विशाल कुंभार, रुपाली राणगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी, पाहुण्यांचा परिचय राजेश गिलबिले यांनी, आभार क्रीडा विभाग प्रमुख पी.पी.भंडारी यांनी तर सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख राम गव्हाणकर यांनी केले.