सिंहवाणी विशेष: पोलिसांच्या नाकावर टिच्चून, नियम धाब्यावर बसवून संपूर्ण जिल्ह्यात ट्रॅक्टर ऊस वाहतूक

सिंहवाणी विशेष:
पोलिसांच्या नाकावर टिच्चून, नियम धाब्यावर बसवून संपूर्ण जिल्ह्यात ट्रॅक्टर ऊस वाहतूक
सिंहवाणी ब्युरो / आनंद चव्हाण, गारगोटी
सध्या ऊसाचा हंगाम सुरु आहे, साहजिकच रस्त्यावर प्रचंड गर्दी होत आहे, तरीही ऊस वाहतुकीची वाहने विशेषतः ट्रॅक्टर वाहतूक नियम धाब्यावर बसवून आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून बेदरकार वाहने चालवून अनेक अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. गेल्या आठवड्यातील अपघाताच्या घटना पाहिल्यास अपघाताला ऊस वाहतुकीची अनेक ट्रॅक्टरच जबाबदार असल्याचे लक्षात येते. तरीही यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.ना प्रशासनाचे आणि ना पोलीस खात्याचे..या प्रशासनाला अजून किती बळी हवे आहेत?,हाच एक प्रश्न आहे.
सध्या राज्यात उसाचा हंगाम सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर वीसभर सहकारी आणि खाजगी साखर कारखाने सुरु आहेत. शिवाय उसाचे क्षेत्र ही कोल्हापूर जिल्ह्यात वाढले आहे. साखर कारखान्यांची उसाची पळवापळवी सुरु आहे. हातकणंगले तालुक्यातून गगनबावड्याला तर भुदरगड तालुक्यातून कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याला ऊस पुरवठा होत आहे. माझ्याच साखर कारखान्याचे उसाचे गाळप जादा व्हावे या लालसेतून ही उसाची वाहतूक १०० किलोमीटरवरून होत आहे. यातूनच आसपास साखर कारखाना नसला तरी उसाने भरलेल्या वाहनांची वाहतूक मात्र सुरु आहे. यामुळे साहजिकच रस्त्यावर वाहनांची गर्दी होत आहे. त्यात साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ट्रॅक्टर आहेतच शिवाय मराठवाड्यातूनही मोठया संख्येने ट्रॅक्टर जिल्ह्यात ऊस वाहतुकीसाठी आल्या आहेत.या ट्रॅक्टरवर निष्णात चालक असतोच असे नाही, शिवाय हे उसाने भरलेले ट्रॅक्टर चालक आपल्या वाहनात मोठ्या कर्णकर्कक्ष आवाजात गाणी लावून ट्रॅक्टर चालवत असतात. ट्रॅक्टर च्या पाठीमागे असणाऱ्या वाहनाना ट्रॅक्टर पास करावयाचा असेल तर मोठ्या आवाजातील गाण्यामुळे हॉर्नचा उपयोग होत नाही, शिवाय रात्री अपरात्री अशी ट्रॅक्टर मोठ्या आवाजात गाणी लावून ऊस वाहतूक करतांना दिसत आहेत, त्यामुळे अनेकांची झोपमोड होते हे वेगळेच.
याशिवाय हे ट्रॅक्टर ओव्हरलोड उसाने भरलेले असतात. त्यातून हे ट्रक्टर चालक रस्त्यावरून मोठी कसरत आपले ट्रॅक्टर चालवत असतात. अनेक वेळा रस्त्याच्या चढाला हे ट्रॅक्टरची चाके वर उचलतात, त्यावेळी मोठी कसरत होते, त्यातून अनेक अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात भुदरगड तालुक्यात करडवाडी येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला, तो रस्त्यावरून बाजूने जाणाऱ्या मोटार सायकल स्वारावर टट्रॅक्टर उलटला, मोटार सायकलचे मोठे नुकसान झाले, दैव बलवत्तर म्हणून मोटार सायकल स्वार बचावला. तर गारगोटी कोल्हापूर राज्य मार्गांवर मडिलगे येथे टेम्पो व उसाचा ट्रॅक्टरचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला,
अशाच अपघाताच्या घटना फक्त भुदरगड तालुक्यात गेल्या आठवड्यात पाच ठिकाणी झाल्या. काल उसाचा ट्रक कोल्हापूर शहरात उलटला ही बातमी ताजी आहे.ट्रकमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले.शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात किंवा फक्त आसपासच्या जिल्ह्यात ऊस वाहनांच्या बेदरकार वाहतूकीमुळे दररोज अशा घटना घडत आहेत. तरीही प्रशासन आणि पोलीस खाते गप्प आहे. या ऊस वाहतुकीच्या वाहनावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे प्रशासनाला आणखी किती बळी हवे आहेत? मगच प्रशासन डोळे उघडणार काय? हा सर्व सामान्यांचा प्रश्न आहे.