“ प्राध्यापकांच्या 5012 जागांची भरती रखडलीच: पात्र उमेदवारांची प्रचंड नाराजी”

“ प्राध्यापकांच्या 5012 जागांची भरती रखडलीच:पात्र उमेदवारांची प्रचंड नाराजी”
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर –
राज्यातील रखडलेल्या प्राध्यापक भरतीबाबत “आश्वासनांचा पाऊस, पण कृती शून्य” अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत NET/SET, Ph.D. धारक उमेदवारांच्या भावना प्रा. जोतीराम सोरटे यांनी व्यक्त केल्या आहेत.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी अकृषी महाविद्यालयातील 5012 पदे आणि अ-कृषी विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसंदर्भात लक्षवेधीच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. भरतीसाठी नेमकी कोणती वित्तीय तरतूद केली आहे, याची माहिती त्यांनी सभागृहात मागितली.
या प्रश्नाला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. आगामी महिन्याभरात महाविद्यालयातील पदसंख्या व विद्यार्थी संख्येच्या आधारे भरती केली जाईल,” असे विधान केले.
मात्र, या विधानावर प्रा. सोरटे यांनी जोरदार आक्षेप नोंदवला.
त्यांच्या मते —
असे आश्वासक विधान मंत्री महोदय यापूर्वीही अनेकदा करत आले आहेत.
प्रत्यक्षात मात्र भरती प्रक्रियेत कोणताही ठोस निर्णय किंवा कृती होत नसल्याचे वास्तव आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार प्राध्यापक भरतीची फाईल अद्याप वित्त विभागाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे.
त्यामुळे GR वा अध्यादेशाचा प्रश्नच उद्भवत नाही.
या विसंगतीमुळे NET/SET आणि Ph.D. धारक पात्र उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, “मंत्री महोदय पात्रताधारकांना फक्त आश्वासनाच्या गाजराने फसवत आहेत” अशी भावना उमेदवारांच्या मनात निर्माण झाली असल्याचे प्रा. सोरटे यांनी स्पष्ट केले.